वैभव गायकर/ लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. शेवटच्या दिवशी सहाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात सर्व पक्षीयांसह अपक्षांनी मोठी गर्दी केली होती. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवल्यामुळे सर्व पक्षांत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, भाजपानेत्यांच्या रात्रभर बैठका सुरू होत्या. सेनेच्या वतीनेही एबी फॉर्मवाटपात प्रचंड गोंधळ झाल्याचे दिसून आले. भाजपाच्या वतीने २६ जणांची पहिली यादी घोषित करण्यात आली होती. मात्र, उर्वरित यादी जाहीर न करता गुपचूप शुक्र वारी रात्री एबी फॉर्म वाटल्याने बऱ्याच इच्छुकांना याची कुणकूण लागली नाही. खारघरमध्ये भाजपाच्या ५० पदाधिकाऱ्यांना घेऊन बंडखोरी करणाऱ्या अभिमन्यू पाटील यांना रातोरात उमेदवारी देऊन भाजपाने बंडखोरी थांबविण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, खारघर प्रभाग-चारमधून लीना गरड आणि वनीता पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, अचानकपणे वनीता पाटील यांनी उमेदवारी मागे घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सेनेच्या वतीने शेवटपर्यंत इच्छुकांना ताटकळत ठेवले होते. शनिवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी १ वाजेपर्यंत बऱ्याच जणांना एबी फॉर्म दिले नसल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी स्थापन केलेल्या महाआघाडीत जास्त प्रमाणात बंडखोरी झाली नाही.खारघर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. भाजपा आमदार प्रशांत ठाकूर, आणि भाजपानेते महेश बालदी यांनी सकाळपासूनच या ठिकाणी उमेदवारासह हजेरी लावली होती. पनवेल शहरासह ग्रामीण भागातदेखील मोठ्या उत्साहात मिरवणूक काढत उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ मे असून, त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, २० प्रभागांत ७८ जागांसाठी शेकडो अर्ज दाखल झाले आहेत. ५ तारखेपर्यंत हा आकडा १२४ एवढा होता. मात्र, शनिवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जाचा आकडा ४००च्या घरात गेल्याचे बोलले जात आहे. शिवसेना ६५, तर स्वाभिमानी संघटना १३ जागांवर लढणार1विजयकुमार गावित यांच्यावर मुख्यमंत्री मेहरबान का, अनेक नेत्यांच्या फाइली मुख्यमंत्र्याकडे तयार आहेत; पण तरीही ते गप्प आहेत, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी लगावला.2खारघर येथे शनिवारी शिवसेना व स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. पनवेल महानगरपालिकेच्या ७८ जागेवर शिवसेना ६५ जागेवर लढत आहेत, तर उर्वरित १३ जागेवर स्वाभिमानी लढवत आहे. 3पनवेल महापालिकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र लढत आहे. महापालिकेच्या दृष्टीने दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने दोन्ही पक्षांचा अजेंडा काय आहे, हे सांगण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेसाठी सेनेचे नेते मंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख आदेश बांदेकर, खासदार श्रीरंग बारणे, बबन पाटील, शिरीष घरत आदी उपस्थित होते. पनवेल महानगरपालिकेच्या ७८ जागांपैकी सेना ६५ जागांवर लढत आहे, तर उर्वरित १३ जागेवर स्वाभिमानी लढवत आहे. 4खासदार शेट्टी म्हणाले, राज्यातील अनेक भागांतील शेतकरी या ठिकाणी स्थायिक झाले आहेत. ते आमच्याशी जोडले गेले असल्याने आम्ही त्यांच्यासाठी ही निवडणूक लढवत असून, त्यांचे प्रश्न नक्कीच सोडवू. एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षरीत्या भाजपाला टोला लगावला. आम्ही तिकिटे देताना सर्वसामान्य कार्यकर्ते पाहिले. पैसे बघून उमेदवारी दिलेली नाही, असेही सांगितले.६३६ उमेदवारी अर्ज दाखलपनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी, शनिवारी २० प्रभागांतून ५१२ अर्ज दाखल करण्यात आले. महापालिकेसाठी आतापर्यंत एकूण ६३६ उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. यापैकी प्रभाग ७,८,९,१० या विभागातून १४० अर्ज, तर प्रभाग १,२,३मधून सर्वात ६६ अर्ज भरण्यात आले आहेत. प्रभाग ४,५,६मधून १०९, प्रभाग ११,१२,१३ मधून ११९, प्रभाग १४, १५,१६मधून ९६ आणि प्रभाग १७, १८ ,१९, २० मधून ११० उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
अर्ज भरण्यासाठी शेवटच्या दिवशी झुंबड
By admin | Published: May 07, 2017 6:32 AM