कर्जतची पाणीयोजना मोजतेय अखेरची घटका
By admin | Published: March 26, 2017 05:13 AM2017-03-26T05:13:04+5:302017-03-26T05:13:04+5:30
शंभर टक्के सरकारी अनुदानातून १९९५मध्ये मंजूर झालेली कर्जत वाढीव पाणीयोजना आता नगरपालिकेच्या नियोजनाअभावी
कांता हाबळे / नेरळ
शंभर टक्के सरकारी अनुदानातून १९९५मध्ये मंजूर झालेली कर्जत वाढीव पाणीयोजना आता नगरपालिकेच्या नियोजनाअभावी तोट्यात चालली आहे. ही पाणीयोजना बंद पडल्यास कर्जतकरांचे पाण्यावाचून हाल होतील, यात शंका नाही. ही पाणीयोजना सुरळीत आणि कमी खर्चात कशी चालू ठेवता येईल, यासाठी पाणी सभापती लालधारी पाल, गटनेते राजेश लाड, शिवसेनेचे नगरसेवक संतोष पाटील, सोमनाथ ठोंबरे, मिलिंद चिखलकर आणि अभियंता गजभिये यांनी पाणीयोजनेची पाहणी करून उपाययोजनांवर चर्चा केली.
कर्जत शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ८० हजार नागरिकांना पुरेल, अशी पाणीयोजना १९९५मध्ये तत्कालीन शिवसेनेचे आमदार देवेंद्र साटम यांनी मंजूर करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून पूर्ण करून घेतली आणि कर्जतकरांचा पाण्याचा प्रश्न सोडवला. पेज नदीला १२ महिने पाणी असल्याचा फायदा घेत नदीवर ही योजना सुरू करण्यात आली. पंपिंग स्टेशन आणि विहीर करून साधारण २० कि.मी. जलवाहिनीद्वारे कर्जत-दहिवली येथे बांधण्यात आलेल्या शुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पाणी आणून पुढे दहिवली, गुंडगे आणि कचेरीवर मोठ्या टाक्या बांधून पूर्ण कर्जत शहराला पाणीपुरवठा होईल, अशी व्यवस्था करण्यात आली होती.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने २००४मध्ये ही योजना कर्जत नगरपालिकेकडे हस्तांतरित केल्यानंतर योजना सुरू ठेवण्यासाठी कर्जत नगरपालिकेला खर्चाची कसरत करावी लागत आहे. या योजनेसाठी पंपिंग स्टेशनवर ८० एच.पी.च्या तीन मशिन बसवल्या आहेत. मात्र, मशिनची पात्रता कमी असल्यामुळे २४ तासांतील २० तास पाणीउपसा करण्यासाठी या मशिन चालू ठेवल्या जात आहेत. तसेच शुद्धीकरण प्रकल्पावर १२० एच.पी.च्या दोन मशिन बसवल्या असून, त्याही साधारण २० तास चालू ठेवल्या जाव्या लागत आहेत. रोज साधारण ४ एमएलडी, म्हणजे चाळीस लाख लिटर पाणीउपसा करावा लागत आहे; परंतु मशिनची क्षमता कमी असल्यामुळे त्या जास्त वेळ सुरू राहत असल्याने वीजबिल भरपूर येत आहे. वर्षाला ८० लाख रु पये वीजबिल हे पाणीयोजनेचे येत आहे. तसेच हे पंप आणि जलवाहिनी जुनी झाल्यामुळे त्याचा देखभालीचा खर्च वाढत आहे. देखभालीसाठी साधारण ६० लाख रुपये खर्च नगरपालिका वर्षाला करते. जास्त हॉर्सपॉवरच्या मशिन न घेतल्याने खर्च वाढत असल्याची चर्चा आहे.
६५ लाखांचा तोटा
नगरपालिकेने शहरात एकूण ५२५० नळजोडण्या दिल्या आहेत. प्रत्येकी १५०० याप्रमाणे साधारण ६० लाख रु पये पाणीपट्टीद्वारे जमा होत आहेत; पण वीजबिल आणि देखभाल खर्च हा साधारण सव्वा कोटींपर्यंत आहे. म्हणजे साधारण, ६५ लाख रु पये तोट्यात पाणीयोजना चालू आहे. असून काही दिवस असे सुरू राहिल्यास नियोजनाअभावी पाणीयोजना बंद पडू शकते.