मयूर तांबडे पनवेल : दरवर्षी रायगड जिल्ह्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून अशा गावांमध्ये विंधण विहिरी खोदल्या जातात. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील गाव, पाड्यांमध्ये शेकडो विंधण विहिरी खोदल्या गेल्या आहेत. २०१२ ते १७ या पाच वर्षांत ६३२ विंधण विहिरी यशस्वी तर २२१ अयशस्वी झाल्या आहेत.एप्रिल-मे महिन्यात दरवर्षी रायगड जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवते. शासकीय पातळीवर पाणीटंचाई दूर करण्यासाठी यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, तरी देखील पाणीटंचाई कमी होत नसल्याचे दिसत आहे. गाव, आदिवासी वाडे, पाडे आदी ठिकाणी पाणीटंचाईच्या झळा पोहोचत आहेत. पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यामुळे २०० फुटांवर खोदण्यात येणाऱ्या विंधण विहिरी अयशस्वी होत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्रत्येक तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांच्या यादीसोबतच या टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा दरवर्षी तयार केला जातो. त्यानुसार मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन संभाव्य टंचाईग्रस्त गावांत विंधण विहिरी मंजूर केल्या जातात. या विंधण विहिरी मारण्यासाठी २०० फुटांची मर्यादा असते. मात्र, पाण्याची पातळी खाली गेलेली असल्याने यातील काही विंधण विहिरींना पाणी लागत नाही. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी गत या टंचाईग्रस्त गाव-पाड्यांची होते.मार्च महिना उजाडला की जिल्ह्यातील काही गावे, पाडे यामध्ये पाणीटंचाई जाणवते. उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते. पावसाळ्याच्या दिवसात पाणी अडवून ते जास्तीत जास्त जमिनीत जिरवले पाहिजे. जेणेकरून भविष्यात पुरेसा पाणीसाठा जमिनीत होईल व त्याचा टंचाईकाळात लाभ होईल. काही गावांमध्ये मार्चपासूनच पाण्याचा खडखडाट होत असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण होते.
पाच वर्षांत ६३२ विंधण विहिरींना लागले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 3:54 AM