नवी मुंबई : सिडकोने खास पोलिसांसाठी सुरू केलेल्या गृहयोजनेला पोलिसांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अर्ज भरण्याची २९ ऑगस्ट अंतिम तारीख आहे. त्यामुळे उर्वरित चार दिवसांत पोलिसांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.
या योजनेंतर्गत आतापर्यंत २,४२५ पोलिसांनी घरांसाठी अर्ज केले आहेत. ४,७७६ पोलिसांनी संबंधित संकेतस्थळाला भेट दिल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. २0१८ मध्ये सिडकोच्या माध्यमातून पंधरा हजार घरांची योजना जाहीर करण्यात आली होती. याच गृहप्रकल्पात ४,४६६ घरे खास पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. या घरांसाठी २८ जुलैपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे. शेवटच्या चार दिवसांत अर्जांची संख्या वाढेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये सध्या सिडकोच्या महागृहप्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. खास पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या ४,४६६ घरांपैकी १,0५७ सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर उर्वरित ३,४0९ सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात सेवा बजावणाºया पोलीस कर्मचाऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. १५ सप्टेंबर रोजी या योजनेची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.