प्रचाराची शेवटची लगबग

By Admin | Published: May 21, 2017 03:27 AM2017-05-21T03:27:11+5:302017-05-21T03:27:11+5:30

सोमवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. प्रचार संपण्याअगोदर शनिवार व रविवार हे सुट्टीचे दोन दिवस उमेदवारांच्या पथ्यावर पडणारे ठरले आहेत.

The last meeting of the campaign | प्रचाराची शेवटची लगबग

प्रचाराची शेवटची लगबग

googlenewsNext

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : सोमवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. प्रचार संपण्याअगोदर शनिवार व रविवार हे सुट्टीचे दोन दिवस उमेदवारांच्या पथ्यावर पडणारे ठरले आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सर्वपक्षीय उमेदवारांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर दिला आहे. शनिवारी बहुतांशी उमेदवारांनी आपला प्रभाग पिंजून काढत, मतदारांशी संवाद साधला.
बुधवार, २४ मे रोजी मतदान होणार आहे. त्यादृष्टीने निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. तर अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू आहे. गावी गेलेल्या मतदारांना परत बोलविण्याचे आवाहन उमेदवारांसमोर आहे. शिवाय, गुरुवार वर्किंग डे असल्याने चाकरमान्यांनी सकाळी मतदान करूनच कामावर जावे, यादृष्टीने उमेदवारांकडून आग्रह केला जात आहे.
सध्या प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध क्लृप्त्या योजिल्या जात आहेत. होर्डिंग व बॅनरबाजीचा धडाका सुरू आहे. प्रचाराच्या डिस्प्ले व्हॅन शहरात गल्लीबोळात फेऱ्या मारू लागल्या आहेत. अनेक उमेदवारांनी प्रचारासाठी तयार केलेल्या क्लिप्स प्रभागात प्रदर्शित केल्या जात आहेत. प्रचाराच्या गाण्यांचा गोंगाट ऐकायला मिळत आहे. एकूणच प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उमेदवारांचा ताण वाढला आहे. कार्यकर्ते जोमाने प्रचारात गुंतले आहेत. प्रचाराची
पत्रके घरोघरी वाटण्याची लगबग सुरू झाली आहे.
सोमवारी प्रचार थांबणार असला, तरी उमेदवारांच्या दृष्टीने रविवार हाच प्रचाराचा अंतिम दिवस असणार आहे. विशेषत: राजकीय पक्षांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानुसार राजकीय पक्षांच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, सुनील तटकरे आदींचा समावेश आहे.

शेवटच्या टप्प्यात लक्ष्मीदर्शन?
प्रचार संपल्यानंतर प्रत्यक्ष मतदानासाठी उरलेल्या ४८ तासांतच खऱ्या अर्थाने उमेदवारांचे भवितव्य ठरते, असा जाणकारांचा अंदाज आहे. या दोन दिवसांत छुप्या प्रचारावर भर दिला जातो. यात उमेदवारांकडून मतदारांना विविध प्रकारची प्रलोभने दिली जातात. मतदारांना ‘लक्ष्मीदर्शन’ अर्थात पैसे वाटले जातात. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी निवडणूक नियंत्रण विभागाची गस्ती पथके कार्यरत झाली आहेत.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर
पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय उमेदवारांकडून प्रचारासाठी सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला जात आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक तसेच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न होत आहेत. अनेकांनी प्रभागातील मतदारांचे व्हॅट्सअ‍ॅप ग्रुप तयार केले आहेत. यात शिवसेना, मनसे, शेकापची महाआघाडी आणि भाजपा आघाडीवर आहेत. या निवडणुकीत सुशिक्षित उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. त्यानुसार सोशल मीडियाबरोबरच मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर अधिक भर दिला जात आहे.

Web Title: The last meeting of the campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.