करावे गावातील भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 11:42 PM2018-12-05T23:42:55+5:302018-12-05T23:43:01+5:30
नवी मुंबई शहरातील स्थानिक प्रकल्पग्रस्त आगरी, कोळी नागरिकांचा मासेमारी हा व्यवसाय आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील स्थानिक प्रकल्पग्रस्त आगरी, कोळी नागरिकांचा मासेमारी हा व्यवसाय आहे. करावे गावातील प्रकल्पग्रस्त नागरिकांना मासेमारी करण्यासाठी पामबीच मार्ग ओलांडून खाडीकडे ये-जा करावी लागते. पामबीच मार्ग ओलांडताना आजवर अनेक अपघात होऊन अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या लढ्यानंतर पालिकेने या मार्गाखालून भुयारी मार्ग बांधण्यास सुरु वात केली असून या भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या भुयारी मार्गामुळे मासेमारी करणाऱ्या नागरिकांना पामबीच मार्ग ओलांडणे सुकर झाले असून मोठा दिलासा मिळाला आहे.
नवी मुंबई शहर हे नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर वसले आहे. या प्रकल्पग्रस्त नागरिकांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असून करावे गावातील बहुतांश नागरिकांचा आजही मासेमारी हा व्यवसाय आहे. या नागरिकांना मासेमारी करण्यासाठी खाडीच्या दिशेने ये-जा करावी लागते. गाव आणि खाडी यांच्यामध्ये असणारा पामबीच मार्ग ही ग्रामस्थांची मोठी समस्या बनली होती. पामबीच मार्गावरून भरधाव वेगाने धावणाºया वाहनांना चुकवीत रस्ता ओलांडताना या ठिकाणी अनेक वेळा अपघात झाले आहेत. यामध्ये काही ग्रामस्थांना इजा झाल्या तर काही ग्रामस्थांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत. करावे गावातून पाम बीच मार्गाच्या पलीकडे ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग बनविण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रेखा म्हात्रे यांनी सुमारे ९ वर्षांपूर्वी करून वेळोवेळी त्याचा पाठपुरावा देखील केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक विनोद म्हात्रे यांनी देखील भुयारी मार्गासाठी पाठपुरावा सुरूच ठेवला होता. सभागृहात भुयारी मार्ग बनविण्याच्या कामाला मंजुरी मिळाली होती. मंजुरी मिळून देखील पालिका प्रशासन कामाला विलंब करीत असल्याने नगरसेवक म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली करावे ग्रामस्थांनी पामबीच मार्गावर रास्ता रोको करून पालिका मुख्यालयावर मोर्चा देखील काढला होता. त्यानंतर प्रशासनाने या कामाची निविदा काढली होती. परंतु पामबीच मार्गावरील वाहनांची वर्दळ आणि जवळ आलेला पावसाळा यामुळे वाहतूक पोलिसांनी भुयारी मार्गाचे काम पावसाळा संपल्यावर सुरू करावे अशी सूचना करीत परवानगी नाकारली होती.
पामबीच मार्गावरील वाहतूक सर्व्हिस रस्त्याने वळविण्यासाठी मार्ग बनविण्यात आला होता. सदर भुयारी मार्गाचे काम करताना १७00 मिमी व्यासाची पाण्याची पाइपलाइन अडथळा ठरत असल्याने देखील या कामाला विलंब झाला. पाण्याची पाइपलाइन देखील स्थलांतरित करण्यात आली. त्यानंतर या मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. आता या मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या भुयारी मार्गामुळे प्रकल्पग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.