- योगेश पिंगळेनवी मुंबई : नवी मुंबई शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असून, गेल्या सात महिन्यांत शहरात सुमारे ३ हजार ३३९ नागरिकांना चावा घेतला असल्याची नोंद झाली आहे. शहर परिसरातील रस्ते, कचराकुंड्या, सिडको वसाहती, गाव-गावठाण, झोपडपट्टी आदी भागांत भटक्या कुत्र्यांचे प्रमाण अधिक आहे. परिणामी वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने रस्त्यावरील अपघातांमध्ये जखमी होऊन अनेक कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. आजारी, तसेच जखमी असलेल्या ३८८ भटक्या कुत्र्यांचा या वर्षी एप्रिलपासून उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, गेल्या वर्षी एप्रिल, २०१९ ते मार्च, २०२० या काळात ३०१ श्वानांचा मृत्यू झाला होता. या वर्षी १ एप्रिल ते ३० ऑक्टोबर या काळात तीन हजार ३३९ नागरिकांना कुत्रे चावण्याच्या घटना घडल्या आहेत. या वर्षी लॉकडाऊनमुळे ही संख्या काही प्रमाणात कमी असून, गेल्या वर्षी एप्रिल, २०१९ ते मार्च, २०२० या काळात सुमारे १० हजार ४८२ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद महापालिकेकडे आहे. श्वान नियंत्रण कार्यक्रम श्वानांची संख्या वाढत असल्याने महापालिकडून श्वान नियंत्रण कार्यक्रम कंत्राटी पद्धतीने राबविला जातो. आजारी, तसेच जखमी झालेल्या कुत्र्यांवर तेथे उपचार करून बरे झाल्यावर त्यांना त्यांच्या मूळ जागेवर पुन्हा सोडण्यात येते. कुत्रे पकडण्यासाठी काय व्यवस्था आहे? जखमी व रोगट श्वान तक्रारीच्या निवारणासाठी २४ तास सेवा आणि रुग्णवाहिनी उपलब्ध असून, प्रशिक्षित मनुष्यबळ, दोन मोठी व एक लहान वाहने महापालिकेच्या श्वान नियंत्रण केंद्रात कार्यरत आहेत.या कुत्र्यांना कोठे सोडले जाते?शहरातील भटक्या व मोकाट श्वानांना पकडून त्यांच्यावर तुर्भे क्षेपण भूमीजवळील तात्पुरत्या श्वान नियंत्रण केंद्रात निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली जाते, तसेच त्यांना रेबीज प्रतिबंधात्मक लस टोचून त्यांच्या मूळ ठिकाणी पुन्हा सोडण्यात येते.या प्रमुख भागांत त्रास : सीबीडी, करावे, इंदिरानगर, घणसोली, सानपाडा, कातकरीपाडा, चिंचपाडा, नोसिल नाका या भागात भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा त्रास जास्त असून, या भागातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक उरलेले अन्न रस्त्याच्या कडेला टाकतात. त्यामुळे अन्नाच्या शोधात असलेल्या श्वानांची संख्या येथे वाढली आहे. महापालिकेच्या श्वान नियंत्रण केंद्राच्या माध्यमातून शहरातील भटके आणि मोकाट श्वानांवर सातत्याने कारवाई सुरू आहे.- संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त, न.मुं.म.पानवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणावर भटके आणि मोकाट कुत्रे आहेत. लहान मुले, नागरिक, ज्येष्ठ नागरिकांना चावा घेण्याचे प्रमाणही वाढले असून, कुत्र्यांमुळे अनेक अपघातही झाले आहेत. कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. - विजय पाटील, नागरिक, नेरुळ
गेल्या सात महिन्यांत तीन हजारांहून अधिक जणांना मोकाट कुत्र्यांचा चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:29 PM