तीन वर्षांत १७०० वाहनांची चोरी, गतवर्षात ३५६ वाहनांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 03:15 AM2018-01-10T03:15:28+5:302018-01-10T03:16:57+5:30
गतवर्षी शहरातून ३५६ वाहने चोरीला गेली असून त्यामध्ये २१७ दुचाकींचा समावेश आहे. गतवर्षी वाहनचोरीच्या घटना कमी असल्या तरीही गुन्ह्यांची समाधानकारक उकल करण्यात मात्र पोलिसांना अपेक्षित यश आलेले नाही. बहुतांश वाहने वाहनचालक अथवा मालकांच्या निष्काळजीमुळे चोरीला गेलेली आहेत.
नवी मुंबई : गतवर्षी शहरातून ३५६ वाहने चोरीला गेली असून त्यामध्ये २१७ दुचाकींचा समावेश आहे. गतवर्षी वाहनचोरीच्या घटना कमी असल्या तरीही गुन्ह्यांची समाधानकारक उकल करण्यात मात्र पोलिसांना अपेक्षित यश आलेले नाही. बहुतांश वाहने वाहनचालक अथवा मालकांच्या निष्काळजीमुळे चोरीला गेलेली आहेत.
पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून मागील तीन वर्षात १७०० हून अधिक वाहने चोरीला गेली आहेत. २०१५ मध्ये ५९४ तर २०१६ मध्ये ६७६ वाहन चोरीचे गुन्हे घडले आहेत. त्यापैकी सुमारे पाचशे गुन्हे तीन वर्षात उघड झाले आहेत. वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण इतर गुन्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. अनेकदा चोरीची वाहने राज्याबाहेर नेली जात असल्याने त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अपेक्षित यश येत नाही. मागील दोन वर्षात पोलिसांनी दुचाकीचोरांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. त्यामुळे गतवर्षात वाहनचोरीच्या गुन्ह्यांना काही प्रमाणात आळा बसलेला आहे. त्यानुसार वर्षभरात परिमंडळ एकमध्ये ३५६ गुन्हे घडले असून २०१६ साली ४८० गुन्हे घडले होते. चोरीला गेलेल्या वाहनांमध्ये ट्रक, टेंपो, कार यासह दुचाकींचा समावेश आहे. इतर वाहनांच्या तुलनेत दुचाकीची चोरी सहज शक्य असते. यामुळे परिमंडळ एकमध्ये गतवर्षी झालेल्या गुन्ह्यांमध्ये २१७ गुन्हे दुचाकी चोरीचे आहेत.
शहरात नियोजनबध्द वाहन पार्किंग नसल्याने रस्त्यालगत, मोकळ्या जागेवर वाहने उभी केली जातात. त्यात दुचाकी म्हणजे वाटेल तिथे उभे करण्याचे वाहन असा काहींचा समज आहे. यामुळे नो पार्किंगमधून अथवा रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकीचोरीचे प्रमाण अधिक आहे. वाहन चालकांकडून योग्यती खबरदारी घेतली जात नसल्याने असे प्रकार घडत आहेत. त्याची पोलिसांना देखील डोकेदुखी होत आहे. गतवर्षात उघड झालेल्या काही गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगारांचाही समावेश असल्याचे समोर आलेले आहे. मौज म्हणून चोरलेली दुचाकी वापरून आडोशाच्या ठिकाणी टाकली जाते, अथवा विकली जाते. त्यामुळे चोरीला गेलेले वाहन परत मिळेल याची शाश्वती कमी झालेली आहे.