नवी मुंबई - कळंबोली येथे असणाऱ्या एसएससी सिमेंट कंपनीमध्ये काम करणाऱ्या माथाडी कामगारांवर कळंबोली पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. ही घटना आज सोमवारी सकाळी घडली. कळंबोली येथील रेल्वे माल धक्यावर टोळी क्रं ३१ मधील काम करीत असलेल्या कामगारांच्या जागेवर तुर्भे येथील कामगारांनी अनधिकृतपणे ठेकेदार, पोलीस आणि राजकीय पाठिंब्याने कामास सुरुवात करण्याचा षडयंत्र केले आहे याला मूळ अधिकृत माथाडी कामगारांनी तीव्र विरोध केला आहे.
हे सर्व कामगार गेल्या सहा वर्षापासुन रेल्वे माथाडी मंडळाला व टोळीला नोंदीत असलेल्या हायलँड सोल्युशन्स (Higland Solutions) या ठिकेदाराच्या कळंबोली रेल्वे माल धक्क्यावर काम करीत आहे. परंतु ठेकेदाराने रेल्वे माथाडी मंडळाला तुर्भे येथील कामगारांना काम करून द्यावे असे पत्र दिले आहे.
रेल्वे माथाडी मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, तुर्भे येथील कामगारांनी कळंबोली धक्क्यावर काम करावे असे पत्र ठेकेदाराला दिलेले नाही. तरी सुध्दा मुजोर ठेकेदाराने पोलिसांसोबत जाणुन बुजुन तुर्भे येथील कामगारांना कळंबोली रेल्वे धक्क्यावर आजपासून काम करण्यास सांगितले आहे. मंडळाने असे कोणतेही कायदेशीर आदेश दिलेले नाहीत. याचाच अर्थ तुर्भे येथील कामगार नोंदीत टोळी ३१ मधील कामगार यांच्यामधे भांडण लावून कामगारांची डोके भडकवून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा कट ठेकेदार करत असल्याचा आरोप माथाडी कामगारांनी केला आहे.
जवळपास १५६ माथाडी कामगारांवर सरळ सरळ ठेकेदार पोलिसांना सोबत घेऊन अन्याय करत आहे. रेल्वे माथाडी मंडळाचे कुठलेही आदेश नसताना अशा पद्धतीने ठेकेदाराच्या मनमानी कारभाराचा सर्व माथाडींनी निषेध केला आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत माथाडी कामगार कुठल्याही दबावाला न पडता या अन्यायाविरोधात तीव्र संघर्ष करण्याच्या भूमिकेत आहे जर न्याय मिळाला नाही तर उपाशी मरण्यापेक्षा पोलिसांची दडपशाही आणि ठेकेदाराची मनमानी या विरोधात शासन प्रशासन यांचे डोळे उघडावे यासाठी आत्मदहन करणार असा इशारा ही माथाडी कामगारांनी दिला आहे.