सेमिकंडक्टरची राजधानी : नवी मुंबई
By नारायण जाधव | Published: September 23, 2024 08:04 AM2024-09-23T08:04:49+5:302024-09-23T08:04:56+5:30
प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबई शहर देशाचे डेटा सेंटर्सचे माहेरघरच नव्हे, तर 'सेमिकंडक्टरची राजधानी' म्हणूनही ओळखले जाणार आहे.
भारतातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या सेमिकंडक्टर प्रकल्पाचा शुभारंभ नवी मुंबईच्या टीसीसी औद्यागिक वसाहतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. या आरआरपी कंपनीच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून, दुसऱ्या टप्प्यात २४ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. तत्पूर्वी गेल्या गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने नवी मुंबईतीलच तळोजा येथेही अदानी समूह आणि टॉवर कंपनीसोबतच्या संयुक्त भागीदारीतील ८३,९४७ कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित असलेल्या सेमिकंडक्टर प्रकल्पास परवानगी दिली आहे. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबई शहर देशाचे डेटा सेंटर्सचे माहेरघरच नव्हे, तर 'सेमिकंडक्टरची राजधानी' म्हणूनही ओळखले जाणार आहे.
आरआरपी इलेक्ट्रॉनिक्सच्या ज्या प्रकल्पाचा शुभारंभ केला तो देशातील पहिला सेमिकंडक्टर प्लांट असून, त्यामुळे चार हजार रोजगार मिळणार आहेत. शिवाय पुण्यातील वेदांताचा प्रकल्प गुजरातला हलविल्यानंतर जे वादळ उठले होते, तेही शमण्यास मदत होणार आहे. याशिवाय तळोजा औद्यागिक वसाहतीतील अदानी समूह आणि टॉवर कंपनीसोबतच्या संयुक्त भागीदारीतील ८३,९४७ कोटी रुपयांचा सेमिकंडक्टर प्रकल्प तीन ते पाच वर्षांत बांधला जाईल, असे सांगण्यात आले आहे. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात ४० हजार चिप आणि आणि दुसऱ्या टप्प्यात ८० हजार चिपचे उत्पादन करण्यात येणार असून, येथे पाच हजार जणांना रोजगार मिळणार आहे.
भारतात तयार होणाऱ्या सेमिकंडक्टर चिप्सचा वापर ड्रोन, कार, स्मार्टफोन आणि इतर प्रकल्पांमध्ये केला जाणार आहे. यामुळे 'मेक इन इंडिया' प्रकल्पाला याद्वारे चालना मिळणार असून, यातून देशी उत्पादनातून या वस्तू स्वस्त होण्याची अपेक्षा केली जात आहे.
यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने फेब्रुवारीमध्ये तीन सेमिकंडक्टर प्लांटला मंजुरी दिली आहे. टाटा कंपनीने यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या गुजरातच्या धोलेरा येथील प्लांटचा पायाभरणी समारंभ नुकताच झाला आहे. तसेच सानंद, गुजरात येथे दुसरा, तर मोरीगाव, आसाम येथे तिसरा प्रकल्प होणार आहे. तिन्ही प्रकल्पांमुळे २० हजार तंत्रज्ञांना नोकऱ्या व सुमारे ६० हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे.
...या प्रश्नांची उत्तरे देणार कोण?
आरआरपी कंपनीला सेमिकंडक्टर निर्मितीचा अनुभव तसेच कंपनीचे मार्केट कॅप खूपच कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीकडे मोठे भागभांडवल, अनुभवी व तज्ज्ञ कर्मचारी नसल्याची चर्चा आहे. शिवाय आरआरपी चिप्स बनवत नसून सेमिकंडक्टर असेंबल करते. मग तिला आपल्या आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत राज्य सरकारने दिलेल्या कोट्यवधींच्या सवलती खरेच उपयोगी पडतील काय, यासह सेमिकंडक्टर कंपनीच्या शुभारंभास क्रिकेटपटू कशासाठी, असे अनेक प्रश्न करून सचिनच्या भूमिकेविषयी सोशल मीडियावर शंका व्यक्त होत आहे.