पनवेल उपजिल्हा रुग्णालय, ट्रॉमा केअर सेंटरचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:04 AM2019-09-12T00:04:30+5:302019-09-12T00:04:38+5:30
पनवेल तालुक्याचा विस्तार मोठा आहे. शहरात एकही मोठे सरकारी रुग्णालय अस्तित्वात नसल्याने खासगी रुग्णालयांकडे रुग्णांना धाव घ्यावी लागते
पनवेल : पनवेल उपजिल्हा रुग्णालय दुर्धर आजारावर उपचार करणारे प्रसिद्ध रुग्णालय व्हावे अशी अपेक्षा होती, त्यानुसार हे रुग्णालय उभे राहिले आहे. या रुग्णालयात आवश्यक असलेल्या बाबींची मी यादी तयार के ली आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी के ले.
पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटरचे लोकार्पण रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी झाले, त्या वेळी ते बोलत होते. १२० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात २० खाटांचे ट्रॉमा सेंटर, १०० खाटांचे रुग्णालय आहे. या व्यतिरिक्त शवागार, शवविच्छेदनगृह या रुग्णालयात असणार आहे. सध्याच्या घडीला पनवेलमध्ये शव ठेवण्यासाठी कोणतीच सुविधा अवलंबून नसल्याने पनवेलमधील अनोळखी मृतदेह वाशी येथील एनएमएमसीच्या रुग्णालयात ठेवावे लागत आहेत. विशेष म्हणजे, पनवेल शहरातील पालिका मुख्यालयाजवळील शवविच्छेदनगृहही अपुऱ्या जागेत एका दुरवस्था झालेल्या खोलीत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना शवविच्छेदन करावे लागत आहे.
पनवेल तालुक्याचा विस्तार मोठा आहे. शहरात एकही मोठे सरकारी रुग्णालय अस्तित्वात नसल्याने खासगी रुग्णालयांकडे रुग्णांना धाव घ्यावी लागते, असे हे उपचार खर्चिक असले तरी पर्यायाच्या अभावी तालुक्यातील नागरिकांना महागडी अशी आरोग्यसेवा स्वीकारावी लागते. मात्र, उपजिल्हा रुग्णालयामुळे गरीब व मध्यमवर्गीयांना नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. या रुग्णालयात औषधे व शस्त्रक्रिया करणारे विविध फिजिशियन यांच्यासोबत बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, दंतशल्य चिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, शल्यचिकित्सक आदी असणार आहेत.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, बाळासाहेब पाटील, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, गौरी राठोड, दिलीप हळदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर आदीसह नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा पार पडणार होता. मात्र, ऐन वेळेला मुख्यमंत्री कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार या उद्देशाने संपूर्ण पनवेल शहर चकाचक करण्यात आले होते.