नवी मुंबई : स्मार्ट सिटीकडे झेप घेणाऱ्या नवी मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळाही स्मार्ट होत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे. रबालेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील महापालिकेच्या राजर्षी शाहू महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी राज्यातील पहिला तरणतलाव सुरू करण्यात आला आहे. झोपडपट्टी वसाहतीमधील विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत असून, या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच क्रीडाक्षेत्रातही उंची गाठता यावी याकरिता विविध उपक्रम राबविले जातात. या तरण तलावाच्या शुभारंभ प्रसंगी एलिफंटा ते गेटवे आॅफ इंडिया अंतर पार केलेल्या वेदांत सावंत आणि राज पाटील या जलतरणपटूूंनी विद्यार्थ्यांना पोहण्याचे धडे दिले. महापौर सुधाकर सोनवणे यांच्या प्रभागातील या शाळेत उद्यान, प्रशस्त वर्ग, मुलांसाठी विविध खेळणी तसेच खेळाचे प्रशिक्षण आदी विकासकामेही करण्यात आली आहे. या शाळेत बालवाडीमध्ये ३०० विद्यार्थी शिक्षण घेत असून इतर महापालिका शाळांपेक्षा या शाळेची पटसंख्या जास्त आहे. मराठी माध्यमात ३००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर हिंदी माध्यमात २०००हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळेतून चांगले जलतरणपटी घडविण्याकरिता तरणतलावाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. २० बाय ४० च्या या तरण तलावांभोवती संरक्षण जाळी लावण्यात आली आहे. अनसया चॅरिटेबल ट्रस्ट आणि लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या या तरण तलावात विद्यार्थ्यांना जलतरणाचे धडे दिले जाणार असून, राज्य तसेच राष्ट्रीय पातळी जलतरणपटू या माध्यमातून तयार केले जाणार असल्याची माहिती महापौर सुधाकर सोनवणे यांनी दिली. ८० हजार लीटरची क्षमता असलेल्या या तरण तलावासाठी बोअरींगचे (बोअरवेल) पाणी वापरले जात असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. उन्हाळ््याच्या सुटीमध्ये चार ते नऊ वयोगटातील कामगारांच्या मुलांना या ठिकाणी सकाळी प्रशिक्षण दिले जात असून शाळा सुरू झाल्यानंतर वर्गनिहाय या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. भरमसाठ फी आकारणाऱ्या खासगी संस्थांमध्ये नाव नोंदवून प्रशिक्षण घेण्याची ऐपत गरीबांकडे नसते. त्यामुळे त्यांच्या मुलांना तज्ज्ञांच्या देखरेखीखाली प्रशिक्षण दिले जाणार आहे. या परिसरात तीनही उद्यानांना बोअरवेलचे पाणी वापरले जाते. (प्रतिनिधी)
महापालिका शाळेतील तरणतलावाचा शुभारंभ
By admin | Published: May 09, 2016 2:36 AM