कायद्याच्या राखणदारांकडूनच वाहतूक नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:02 AM2018-04-24T01:02:02+5:302018-04-24T01:02:02+5:30
हेल्मेटचा वापर नाही : पोलिसांच्या बेशीस्तपणाविषयी नाराजी
नामदेव मोरे ।
नवी मुंबई : रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त पोलिसांकडून शहरात सर्वत्र जनजागृती अभियान राबविले जात आहे. नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे; परंतु दुसरीकडे पोलीसच नियमांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. पोलीस हेल्मेटचा वापर करत नाहीत. अनेक ठिकाणी उलट दिशेने प्रवास केला जात आहे. रिक्षामध्ये चालकाच्या बाजूला बसून प्रवास केला जात असून, कायद्याच्या राखणदारांना नियम लागू नाहीत का? असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
नवी मुंबई व पनवेलमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अपघात कमी व्हावे व वाहतूककोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे; पण सुरक्षा अभियान राबविणाऱ्या यंत्रणेची स्थिती, ‘दुसºया शिकवी ब्रम्हज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण’ अशी झाली आहे. पोलीस आयुक्तांपासून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपर्यंतचे अधिकारी वाहतूक नियमांचे पालन करतात; परंतु इतर पोलीस कर्मचारी मात्र वाहतूक नियम पायदळी तुडवत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. कोपरखैरणे पोलीस स्टेशनमधून तीन टाकीकडे जाण्यासाठी पोलीस नियमितपणे उलट दिशेने प्रवास करत आहेत. बिनधास्तपणे वाहने उलट्या लेनवरून घेऊन जात असल्याचे नागरिकांना रोज पाहावयास मिळत आहे. पोलीस स्टेशनवरून तीन टाकीकडे जाण्यासाठी डी-मार्ट चौकाला वळसा घालून जावे लागते. हा त्रास टाळण्यासाठी उलट दिशेने मोटारसायकलने प्रवास सुरू असतो. पोलीस कर्मचारी हेल्मेटचाही वापर करत नाहीत. यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी नियम तोडले तर चालते व सामान्य नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
नवी मुंबईमध्ये रिक्षामधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करण्याचे प्रमाण जास्त आहे. रिक्षाचालक चार ते पाच प्रवासी बसवत असतात. अशा रिक्षाचालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत; परंतु दुसरीकडे पोलीसच रिक्षाचालकाच्या बाजूला बसून प्रवास करत असल्याचे चित्र वाशी व इतर ठिकाणी पाहावयास मिळत आहे. खाकी वर्दी किंवा वाहतूक पोलिसांचा गणवेश असलेले पोलीस कर्मचारी रिक्षाला हात करतात व त्यांना इच्छित ठिकाणी सोडण्यास भाग पाडतात. रिक्षाचालकाला पैसेही देत नसल्याचे नागरिक पाहत असतात. रिक्षाचालकाच्या बाजूला बसून पोलीस प्रवास करत आहेत.
पाट्यांचाही गैरवापर
वाहतूक पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी पाट्यांवर प्रेस व पोलीस लिहिण्याचे प्रमाण वाढत आहे. वास्तविक या दोन्ही प्रकारच्या पाट्या लिहिणे नियमात बसत नाही; परंतु कारवाई होऊ नये, यासाठी पोलिसांच्या खासगी वाहनांवर व ज्यांचा पोलीस दलाशी संबंध नाही, अशांच्या वाहनांवरही पोलीस असल्याच्या पाट्या झळकू लागल्या आहेत, यामुळे पोलिसांची प्रतिमा बिघडू लागली आहे.
नियम सर्वांसाठी सारखे
यापूर्वी पामबीच रोडवर एक पोलीस कर्मचाºयाचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता. हेल्मेट न घातल्याने या कर्मचाºयाचा मृत्यू झाला होता. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास अपघात होण्याची व जीव गमावण्याची शक्यता असते. यामुळे पोलीस, पत्रकार, राजकीय पक्षाचे पदाधिकारी सर्वांनीच नियमांचे पालन करावे, असे आवाहन दक्ष नागरिकांनी केले आहे.