मतदारांशी संवाद साधण्यासाठी नेते, पदाधिकारी घरोघरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 05:13 AM2019-10-12T05:13:14+5:302019-10-12T05:13:23+5:30
पनवेल विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने युतीचे उमेदवार भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी मतदारांशी प्रत्यक्ष भेटींवर भर दिला आहे.
पनवेल : पनवेल विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने युतीचे उमेदवार भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी मतदारांशी प्रत्यक्ष भेटींवर भर दिला आहे. शुक्रवारी पनवेल तसेच कामोठे शहरात सेना-भाजपचे पदाधिकारी प्रचारासाठी रस्त्यावर उतरले होते. घरोघरी जाऊन त्यांनी नागरिकांना मतदानासाठी आवाहन केले.
ग्रामीण भागातील प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर शहरी भागातील प्रचाराला भाजपने सुरुवात केली आहे. पनवेल शहरातील विविध भागासह कोळीवाडा परिसर, विविध गृहसंकुले, सोसायट्यांमध्ये जाऊन प्रशांत ठाकूर यांनी मतदारांची भेट घेतली. या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, सभागृह नेते परेश ठाकूर आदीसह नगरसेवक व भाजप सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही प्रचारसभेसाठी खारघरमध्ये बुधवार, १६ आॅक्टोबर रोजी येणार आहेत, त्यामुळे त्या दृष्टीने परिसरात उपाययोजना करण्यात येत आहेत. १९ आॅक्टोबरला प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. पनवेल हा राज्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने उमेदवारांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.