वाढीव वीजबिलासंदर्भात नेत्यांचे कागदी घोडे; महावितरणचा रेटा कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 12:14 AM2020-08-26T00:14:29+5:302020-08-26T00:14:48+5:30

सर्वसामान्य ग्राहकांची होते आहे आर्थिक कोंडी

Leaders' paper horses on increased electricity; MSEDCL rates maintained | वाढीव वीजबिलासंदर्भात नेत्यांचे कागदी घोडे; महावितरणचा रेटा कायम

वाढीव वीजबिलासंदर्भात नेत्यांचे कागदी घोडे; महावितरणचा रेटा कायम

Next

कमलाकर कांबळे 

नवी मुंबई : महावितरणने टाळेबंदी असतानाही अव्वाच्या सव्वा वीज देयके पाठविली आहेत. नोकरी, व्यवसायांवर गदा आली आहे. सर्व व्यवहार ठप्प पडले आहेत. घरात बसून दोन वेळच्या जेवणाची भ्रांत झाली आहे. अशा परिस्थितीत महावितरणने अवास्तव वीज देयके पाठवून सर्वसामान्यांच्या समोर नवीन आर्थिक संकट उभे केले आहे. या समस्येकडे नवी मुंबईतील नेते दुर्लक्ष करत आहेत.

कोरोनामुळे मागील चार महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. नोकरीधंदा ठप्प पडल्याने बहुतांशी लोकांना घरातच राहावे लागत आहेत. पर्याय म्हणून काहींना वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. जून महिन्यापासून अनेक शाळांनी आॅनलाइन वर्ग सुरू केले आहेत. वर्क फ्रॉम होम आणि आॅनलाइन शाळांमुळे विजेच्या वापरात नक्की किती वाढ होणार आहे, याचे गणित सर्वसामान्यांच्या दृष्टीने नगण्य आहे. असे असले, तरी महावितरणसाठी या बाबी सुवर्णसंधीच्या रूपात प्रकटल्या आहेत. कारण लॉकडाऊनच्याच काळात महावितरणने वीजदरात वाढ केली. त्यानंतर, पावसाळ्याचे दिवस असतानाही जून-जुलै या दोन महिन्यांच्या वीजबिलात भरमसाट वाढ केली. लॉकडाऊनमुळे काटकसरीची सवय लागलेल्या सर्वसामान्य घटक एसीच काय, साधा पंखाही लावायला धजावणार नाहीत. ही वस्तुस्थिती असताना, या दोन महिन्यांची वीजबिले दुप्पट ते तिप्पट कशी वाढली. त्याबाबत ग्राहकांनी गळा आढून ओरड केली. मंत्रालय स्तरावर बैठका झाल्या. सरकार वीजबिल कमी करण्याच्या विचारात असल्याच्या बातम्या पेरण्यात आल्या, परंतु तशी कोणतीही सुखद वार्ता आली नाही. उलट आॅगस्ट महिन्याची देयकेही अवाढव्य पाठविण्यात आली. ऐन उत्सवाच्या काळात भरमसाट बिले आल्याने सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीला आला आहे. महावितरणला याचा जाब विचारण्यासाठी नवी मुंबईतील एकही नेता पुढे सरसावताना दिसत नाही. कोणी कायदेशीर लढाई लढण्याची तयारीही दाखविली नाही. महापालिकेच्या आगामी निवडणुकांवर लक्ष ठेवून केवळ कागदी घोडे नाचविण्यात ही तथाकथित नेते मंडळी मशगुल आहेत. याला कोणत्या मानसिकतेचे द्योतक म्हणावे, असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे.

ठाणे, मुंबईसह वाढीव वीजबिलाच्या विरोधात आक्रमक आंदोलने सुरू आहेत. अनेक जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे. वाढीव वीजबिलाच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने सुरू असताना, नवी मुंबईतील नेतेमंडळी मात्र महापालिका निवडणुकीची व्यूहरचना करण्यात व्यस्त असल्याचे पाहावयास मिळत आहेत. राजकीय पक्षांची आंदोलने व निदर्शने केवळ दिखाऊपणाची ठरली आहेत. कारण महावितरण आपल्या भूमिकेवर ठाम आहे. वाढीव बिलाची तक्रार घेऊन जाणाऱ्या ग्राहकांना अगदी क्लिष्ट पद्धतीने बिल कसे योग्य आहे, हे पटवून देण्याचे चोख काम महावितरणचे संबंधित अधिकारी करीत आहेत. अशा परिस्थितीत कोणाकडे दाद मागायची, असा सवाल शहरातील विद्युत ग्राहकांना सतावत आहे.

अनियमित वीज, तरीही अवास्तव देयके
शहराच्या अनेक भागांत आजही नियमित वीजपुरवठा होत नाही. विशेषत: घणसोली परिसरात तर विजेचा खेळखंडोबा येथील रहिवाशांच्या पाचवीलाच पूजला आहे. त्या पाठोपाठ ऐरोली, गोठीवली, तसेच कोपरखैरणे परिसरातील रहिवाशांनी सातत्याने अनियमित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याऐवजी महावितरण अवास्तव बिले पाठवून ग्राहकांची लूट करीत असल्याचा आरोप शहरवासीयांकडून केला जात आहे.

Web Title: Leaders' paper horses on increased electricity; MSEDCL rates maintained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.