नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती
By नामदेव मोरे | Published: February 16, 2024 07:36 PM2024-02-16T19:36:31+5:302024-02-16T19:36:43+5:30
सायंकाळचा पाणी पुरवठा बंद : शनिवारी सकाळी पाणी पुरवठा सुरळीत होणार.
नवी मुंबई : नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणावरील जलवाहिनीला बेलापूरमध्ये गळती लागली. दुरूस्तीचे काम तत्काळ सुरू केल्यामुळे शहरात सायंकाळी पाणी पुरवठा होऊ शकला नाही. शनिवारी सकाळपासून पाणी पुरवठा पुन्हा सुरळीत होणार आहे.
महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये सीबीडी ते ऐरोली दरम्यान परिसराला मोरबे धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो. मुख्य जलवाहिनी पामबीच रोडवरून वाशीकडील मार्गावर टाकण्यात आली आहे. बेलापूर सेक्टर २८ मध्ये सकाळी १० वाजण्याच्या सुमारास जलवाहिनीला गळती लागल्याचे निदर्शनास आले. अभियांत्रीकी विभागाने तत्काळ जलवाहिनीवरील पाणी पुरवठा थांबवून दुरूस्तीचे काम सुरू केले. सायंकाळी ६ वाजल्यानंतरही दुरूस्तीचे काम सुरू होती. रात्री ८ पर्यंत दुरूस्तीचे काम पूर्ण होईल अशी माहिती अभियांत्रीकी विभागाने दिली. नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहनही करण्यात आले आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे नवी मुंबईतील सायंकाळचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. शनिवारी सकाळी पाणी पुरवठा पुन्हा पुर्ववत होईल अशी माहिती महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.
जलवाहिनी फुटली की फोडली
सीबीडी बेलापूर येथे जलवाहिनीला गळती लागल्यामुळे तत्काळ दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु जलवाहिनीला गळती कशी लागली असा प्रश्न उपस्थित होत आहे. टँकर चालकांनी जलवाहिनीला छेद करण्याचा प्रयत्न केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. महानगरपालिका प्रशासनही याविषयी चौकशी करत असून जलवाहिनीशी छेडछाड केल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधीतांवर कारवाई केली जाणार आहे.