नवी मुंबई : शिक्षणाला वयाची अट नसते हे सिवूडमधील ५० वर्षांच्या तेजस्विनी महाडिक यांनी स्वकृतीतून दाखवून दिले आहे. ३० वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा शिक्षण सुरू करून त्यांनी मराठी विषयात एम.ए.ची पदवी प्रथम श्रेणीत मिळविली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सिवूड येथे राहणाऱ्या तेजस्विनी महाडिक यांनी १९९४ मध्ये बी.कॉमची पदवी मिळविली. पुढे कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण थांबले. कॉमर्समध्ये पदवी मिळविली असली तरी त्यांना मराठी साहित्याची आवड होती. पती रवींद्र महाडिक यांच्यासोबत सिवूड रेसिडेन्स वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग घेत होत्या. मराठीमध्ये पुढील शिक्षण घ्यावे, अशी ओढ मनात होती.
परिसरात राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्रा. वर्षा भोसले यांच्याशी चर्चा करताना मुंबई विद्यापीठातून मराठी विषयात एम.ए. करणे शक्य असल्याचे समजले. यानंतर मुंबईतील के.जी. सोमय्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. नुकताच एम.ए.चा निकाल लागला असून, तेजस्विनी या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. ३० वर्षांच्या ब्रेकनंतर मिळालेल्या पदवीविषयी कुटुंबातील सर्वांना आनंद झाला. शिवाय सिवूडमधील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिक्षणास वयाची अट नसते. मनात इच्छा असेल तर खंडित झालेले शिक्षण कधीही पूर्ण करता येते हे त्यांनी स्वकृतीतून दाखवून दिले असून, यामुळे अनेकांना शिक्षण पूर्ण करण्याची प्रेरणा मिळेल अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमातून नागरिकांनीही व्यक्त केल्या आहेत. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षणामध्ये अनेक वर्षांचा खंड पडला होता. मराठी विषयाची आवड होती. यामुळे त्यामध्येच पुढील शिक्षण घ्यावे असे ठरविले. ३० वर्षांनंतर पदव्युत्तर पदवी मिळविता आली याचा विशेष आनंद आहे. - तेजस्विनी महाडिक, सिवूड