पनवेलमध्ये महानगरच्या गॅसवाहिनीला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 05:09 AM2019-04-01T05:09:05+5:302019-04-01T05:09:24+5:30
अनर्थ टळला : परिसरातील गॅसपुरवठा खंडित; नागरिकांची गैरसोय
पनवेल : शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीत भूमिगत गटाराचे खोदकाम सुरू असताना रविवारी सकाळी महानगरची गॅसवाहिनी फुटली. त्यामुळे अर्धा तास वायुगळती झाली. मात्र, गळती त्वरित नियंत्रणात आणल्याने अनर्थ टळला. मिडलक्लास हौसिंग सोसायटी परिसरात महिन्याभरापासून महापालिकेच्या माध्यमातून भूमिगत गटार बांधण्याचे काम सुरू आहे. याकरिता मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. रविवारीदेखील अशाच प्रकारे भूखंड क्र मांक ८४ जवळील स्वामी समर्थ इमारतीसमोर जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम सुरू होते. सकाळी ९ च्या सुमारास खोदकाम करताना एका ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात गॅसचे फवारे वर निघू लागले.
परिसरातील रहिवाशांच्या निदर्शनास ही बाब येताच, त्यांनी अग्निशमन दल व महानगर गॅस कॉर्पोरेशनला कळवले. सुमारे ३० मिनिटांनी या गळतीवर नियंत्रण मिळविण्यात आले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारीही या वेळी घटनास्थळी दाखल झाले होते. गॅसगळतीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. महानगर गॅसमध्ये नैसर्गिक वायू असल्याने तो ज्वलनशील पदार्थाच्या संपर्कात आल्यास आगीचा भडका उडण्याची शक्यता असते. येथील रहिवासी संजय दलाल यांनी गॅसगळतीची बाब अग्निशमन व महानगर गॅस प्रशासनाच्या निदर्शन आणून दिली. गॅसगळती थांबविण्यासाठी परिसरातील सर्व गॅसपुरवठा खंडित करण्यात आला होता. तसेच परिसरातील मार्गही काही काळ बंद ठेवण्यात आला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. गॅसपुरवठा खंडित केल्याने अनेकांची गैरसोय झाली.
समन्वयाचा अभाव
पनवेलमध्ये ज्या परिसरात भूमिगत गटारांसाठी खोदकाम सुरू होते, त्या ठिकाणी महानगर गॅसलाइन गेल्याचे सूचना फलक लावण्यात आले आहेत. तरीदेखील पालिकेने याबाबत महानगर गॅस व्यवस्थापनाशी समन्वय न साधता थेट कामाला सुरु वात केली. समन्वयाअभावी ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.
गॅसगळती झालेल्या ठिकाणी महानगर गॅसची टीम दाखल झाली आहे. परिसरातील गॅसपुरवठा त्वरित खंडित करण्यात आला आहे. हे काम करताना महापालिकेने कोणताही समन्वय साधलेला नाही. गॅसवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होताच गॅसपुरवठा सुरळीत होईल.
- संदीप सिंग लोहिया,
महानगर गॅस, एमर्जन्सी कंट्रोल रूम