नवी मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षामुळे सिडकोची नियोजित २६ नोव्हेंबरची घरांची सोडत रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र घरांची सोडत ही पूर्वनियोजित प्रशासकीय प्रक्रिया असल्याने ठरलेल्या दिवशीच म्हणजेच २६ नोव्हेंबर रोजीच होईल, असे सिडकोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.स्वप्नपूर्ती प्रकल्पातील शिल्लक राहिलेली ८१४ आणि नवीन प्रकल्पातील ९२४९ घरांसाठी सिडकोने आॅनलाइन अर्ज मागविले होते. हे अर्ज सादर करण्यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत जवळपास एक लाख अर्ज प्राप्त झाल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या घरांसाठी २६ नोव्हेंबर रोजी नेरूळ येथील आगरी कोळी भवनमध्ये सकाळी १0 वाजता ही संगणकीय सोडत काढण्याचे सिडकोने जाहीर केले आहे. मात्र मागील राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षामुळे नियोजित सोडत होईल की, नाही याबाबत अर्जदारांत संभ्रमाचे वातावरण आहे. असे असले तरी सोडतीचा कार्यक्रम हा पूर्वनियोजित असल्याने सिडकोच्या संबंधित विभागाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. सोडतीचा कार्यक्रम पूर्वनियोजित प्रशासकीय कामाचा भाग आहे. त्यामुळे २६ नोव्हेंबर रोजीच सोडतीचा कार्यक्रम होईल, असे सिडकोच्या पणन विभागाचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत डावरे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले आहे.
घरांची सोडत २६ नोव्हेंबरलाच होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 11:58 PM