ऐरोलीत स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी व्याख्यान, महापालिकेचा उपक्रम
By योगेश पिंगळे | Published: March 5, 2024 04:45 PM2024-03-05T16:45:32+5:302024-03-05T16:46:07+5:30
तरुणाईचा उत्साही प्रतिसाद
नवी मुंबई : भारतीय संविधान दिनाच्या अमृतमहोत्सवी पर्वानिमित्त ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामधील एक अभिनव उपक्रम तरुणाईच्या उत्साही उपस्थितीत झाला. यामध्ये वर्धा येथील नालंदा अकॅडमीचे संस्थापक अनुप कुमार यांनी ‘स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षण' या विषयावर युवकांशी थेट संवाद साधत अनेक बाबींवर प्रकाशझोत टाकला.
सर्वसाधारणपणे आपल्याकडील युवकांचे ध्येय सरकारी नोकरी हे असते. यासाठी यूपीएससी, एमपीएससी अशा स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जीवनातील महत्त्वाची चार ते पाच वर्षे द्यावी लागतात. या पलीकडेही मोठे विश्व असून, तिथेही करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत, त्यांचा लाभ घेतला पाहिजे, असे अनुप कुमार यांनी सांगितले. मुलांनी चांगले उच्च शिक्षण घ्यावे, ज्ञानी व्हावे, हे लक्ष्य नजरेसमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे, असे सांगत त्यांनी उच्च शिक्षणाच्या तसेच नोकरी-व्यवसायाच्या अनेक पर्यायांचा खजिना उपस्थितांसमोर खुला केला.
यावेळी त्यांनी उपस्थित युवकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली व युवकांच्या माहिती आणि ज्ञानात भर टाकली. यावेळी समाजविकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, दिघा विभागाचे विभाग अधिकारी डॉ. कैलास गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे, समाजविकास अधिकारी सर्जेराव परांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.