नवी मुंबई : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर आणि मुंबई पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडी व महायुतीत तिढा सुटला असून या जागांवर आता दाेघांत थेट सामना होणार आहे. मात्र, मुंबई शिक्षक मतदारसंघातील अजित पवार गटाच्या शिवाजी नलावडे यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. तर कोकण पदवीधर संघात महायुतीचे निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत रंगणार आहे. येथून शेवटच्या क्षणी शिवसेना उद्धवसेनेचे किशोर जैन आणि शरद पवार गटाचे अमित सरैया तर शिंदेसेनेचे संजय मोरे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
तिकडे मुंबई शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे प्रकाश सोनवणे यांनीदेखील उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसेच भाजपाचे बंडखोर अनिल बोरनारे यांनी अर्ज मागे घेतल्याने येथे उद्धवसेनेचे ज. मो अभ्यंकर आणि भाजपाचे शिवनाथ दराडे आणि अजित पवार गटाच्या शिवाजी नलावडे यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे.
मुुंबई पदवीधरमधून भाजपाचे किरण शेलार आणि मविआचे अनिल परब यांच्यात लढत आहे. येथून शिंदेसेनेच्या दीपक सावंत यांनी अर्ज मागे घेतला आहे.