नामदेव मोरे
नवी मुंबई : तीव्र उखाड्यामुळे मुंबई, नवी मुंबईमध्ये लिंबूला मागणी वाढली आहे. जानेवारीच्या तुलनेमध्ये तिप्पट विक्री होत ओह. मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिदिन ५० टन पेक्षा जास्त विक्री होत असून किरकोळ मार्केटमध्ये एक लिंबू ७ ते ८ रुपयांना विकले जात आहे.
एप्रिलच्या सुरुवातीपासून उखाडा वाढू लागला आहे. तापमान ३८ ते ४० अंशापर्यंत पोहचले आहे. तीव्र उखाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून दुपारी घराबाहेर काम करणारांना उष्माघाताचा त्रास होऊ लागला आहे. उखाड्यापासून बचाव करण्यासाठी लिंबू पाण्याचा उपयोग केला जात आहे. मुंबई कृषी उत्पन्न् बाजार समितीमध्ये जानेवारीमध्ये सरासरी १० ते १५ टन आवक होत होती. एप्रिलच्या सुरुवातीपासून सरासरी ५० टन आवक होऊ लागली आहे. होलसेल मार्केटमध्ये बाजारभाव १५ ते २५ रुपये किलोवरून ४० ते ८० रुपयांवर पोहचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये एक लिंबू ७ ते ८ रुपयांना विकले जात आहे. बाजार समितीमध्ये सद्यस्थितीमध्ये ९५ टक्के लिंबू आंध्रप्रदेशमधून येत आहे. महाराष्ट्रातील लिंबूचा हंगाम संपला आहे. महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर व संपूर्ण विदर्भामधून जून ते मार्च दरम्यान लिंबूची मोठ्या प्रमाणात आवक होत असते.
उन्हाळा असल्यामुळे लिंबूची मागणी वाढली आहे. सद्यस्थितीमध्ये आंध्रप्रदेशमधून मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. पुढील काही दिवस बाजारभाव स्थिर राहतील.चंद्रकांत महामुलकर, लिंबू व्यापारी, मुंबई एपीएमसी
मुंबई बाजार समितीमधील प्रतिकिलो बाजारभाव व आवक
महिना - आवक(टन) -बाजारभावजानेवारी - ११ - १५ ते २५फेब्रुवारी - १८ - २५ ते ४०मार्च - २९ - ४० ते ७५एप्रिल ५० - ५५ ते ७५