मधुकर ठाकूर
उरण : चिरनेर परिसरातील इंद्रायणी डोंगराजवळील रस्त्यावर शनिवारी (१४) रात्री ७-४५ च्या सुमारास प्रवाशांना बिबट्याचे दर्शन झाले. मोबाईलवरूनच बिबट्याचे चित्रिकरण करून चित्रफीत वनविभागाकडे पाठविण्यात आली असल्याची माहिती प्रवासी अनंत नारंगीकर यांनी दिली.
मागील महिन्यात कर्नाळा पक्षी अभयारण्यातून चिरनेर-दिघाटी-केळवणे परिसरातील रस्ते , गावाजवळ बिबट्या मुक्त संचार करीत असल्याचे आढळून आले होते.त्यानंतर परिसरातील अनेक डोंगर, टेकड्या ,जंगल गावपरिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याचे सांगितले जात होते.त्यानंतर शनिवारी ( १४) रात्री ७-४५ च्या सुमारास चिरनेर परिसरातील दिघाटी - चिरनेर -इंद्रायणी डोंगराच्या जवळील रस्त्यावरुन जाताना एक बिबट्या प्रवाशांच्या निदर्शनास आले आहे.गाडीतुन प्रत्यक्ष दर्शन घेतलेल्या बिबट्याचे फोटो,
चित्रिकरणही प्रवाशांनी केले आहे.मोबाईलवरून बिबट्याचे चित्रिकरण केलेली चित्रफीत वनविभागाकडे पाठविण्यात आली असल्याची माहिती प्रवासी अनंत नारंगीकर यांनी दिली. भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या नागरी परिसरात येत असल्याने वन विभागाने खबरदारीची उपाययोजना म्हणून याआधीच नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करीत ठिक ठिकाणी सुचना फलक लावण्यात आले आहेत. तसेच याबाबत जनजागृती करण्यासाठी परिसरातील नागरिकांची दोन दिवसांत बैठक बोलावली असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.दरम्यान चिरनेर परिसरातील दिघाटी - चिरनेर -इंद्रायणी डोंगर परिसरात पुन्हा एकदा फुटलेल्या बिबट्यांच्या डरकाळीने मात्र रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.