पनवेल : तळोजा एमआयडीसीत बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आल्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसरामध्ये शोधमोहीम सुरू केली असून, अनेक ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत.पेंधर येथील कोलटेन कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये परिसरामध्ये बिबट्या फिरत असल्याचे निदर्शनास आले. बिबट्याचा व्हिडीओ व फोटो सोशल मीडियामधून व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरामध्ये १४ गावे आहेत. बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने वनविभागाचे अधिकारी व पोलिसांनी परिसरामध्ये शोधमोहीम सुरू केली. अनेक ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. वनविभागाने गावांमध्ये व परिसरामधील वसाहतीमध्ये जाऊन नागरिकांना दिलासा दिला. कोणीही घाबरू नये. रात्री विनाकारण घराबाहेर फिरू नये, अशा सूचनाही दिल्या.दिवसभर परिसरामध्ये बिबट्याचीच चर्चा सुरू होती. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभाग व पोलिसांनी केलेल्या जागृतीमुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून, मनातील भीती काही प्रमाणात कमी झाली आहे.बिबट्या आला कोठून याबाबत संभ्रम कायमयापूर्वी उरण परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले होते. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जंगल असून उर्वरित परिसराचे शहरीकरण झाले असल्यामुळे बिबट्या मानवी वस्तीमध्ये आल्याचे पाहावयास मिळाले होते.परंतु तळोजा परिसरामध्ये पहिल्यांदाच बिबट्या आढळला आला आहे. मात्र तो नक्की कोठून आला याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे परिसरातील पाणवट्यांचीही पाहणी करुन त्याच्या वास्तव्याच्या ठिकाणाचा शोध घेतला जात आहे.
तळोजात बिबट्याची शोधमोहीम; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडून दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 12:23 AM