उरण : तालुक्यातील वाघधोंडी डोंगर परिसरात मंगळवारी कंटेनर यार्डमध्ये काम करणाऱ्या बाळा ठाकूर (रा.चिरनेर) या कामगाराला बिबट्या गुरांच्या मागे धावताना दिसून आला. परिसरात अचानक बिबट्याचा वावर आढळल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.उरण तालुक्यातील अनेक गावे डोंगरपायथ्याशी वसलेली आहेत. मागील काही वर्षांपूर्वी डोंगर परिसरात बिबट्याचा, मोर, रानडुक्कर, ससे, हरीण, भेकर सांरख्या जंगलातील पक्षी-प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असे; परंतू सातत्याने होत असलेली शिकार आणि वाढते औद्योगिकीकरण व डोंगर परिसरात होणाºया मातीच्या उत्खननामुळे जंगल संपत्तीचा मोठ्या प्रमाणावर -हास झाला आहे.जंगलातील प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून हळूहळू त्यांचे अस्तित्व संपुष्टात येऊ लागले आहे. त्यामुळे जंगल संपत्तीच्या, प्राण्याच्या ºहासाला सर्वश्री वन विभागाचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. तालुक्यातील डोंगर परिसरात बिबट्या नसल्याचा शोध दहा वर्षांपूर्वी लावला होता. मात्र, करंजा गावात मध्यंतरी बिबट्या शिरल्याचे आढळून आले. त्यात मंगळवारी वाघधोंडी डोंगर परिसरात वसलेल्या कंटेनर यार्डमध्ये काम करणाºया चिरनेर गावातील बाळा ठाकूर या कामगाराला गुरांच्या मागे धावताना बिबट्या दिसल्याच्या चर्चेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.भयभीत झालेल्या कामगारांनी या बिबट्या आढळल्याची माहिती यार्डाच्या सुरक्षारक्षकांना दिली. तसेच वाघधोंडी परिसरातून गव्हाण फाटा-चिरनेर मार्गावरून प्रवास करणाºया वाहनचालकांनी, प्रवाशांनी आणि कामगारवर्गाने सावधानता बाळगावी, असे आवाहन या परिसरातील कामगारांकडून केले जात आहे.दरम्यान, उरण परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती अद्याप तरी वनविभागाला कुणीही कळविलेली नाही. तसेच नुकत्याच झालेल्या पशूगणनेतही उरण परिसरातील जंगलात बिबट्याचे अस्तित्व आढळून आले नसल्याची माहिती उरण वनविभागाचे अधिकारी शशांक कदम यांनी दिली. वनविभागाच्या स्पष्टीकरणामुळे बिबट्याच्या वावराबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. फणसाड अभयारण्यात बिबट्याचा वावर असल्याने येथील स्थानिकही भीतीच्या छायेत आहेत.
उरण वाघधोंडी परिसरात बिबट्याचा वावर : चर्चेमुळे घबराट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 2:54 AM