कुष्ठरोग, शेतकरी आत्महत्या, नक्षलवादाची लीगसी संपवायला हवी

By Admin | Published: April 18, 2017 11:43 PM2017-04-18T23:43:01+5:302017-04-18T23:43:01+5:30

रिजन्सी प्रस्तुत ‘लोकमत’ लीगसी कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त लोकमतचे सहयोगी संपादक मिलिंद बेल्हे आणि सुप्रसिद्ध निवेदिका...

Leprosy, farmer suicides, Naxalism legacy should end | कुष्ठरोग, शेतकरी आत्महत्या, नक्षलवादाची लीगसी संपवायला हवी

कुष्ठरोग, शेतकरी आत्महत्या, नक्षलवादाची लीगसी संपवायला हवी

googlenewsNext

रिजन्सी प्रस्तुत ‘लोकमत’ लीगसी कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त लोकमतचे सहयोगी संपादक मिलिंद बेल्हे आणि सुप्रसिद्ध निवेदिका उत्तरा मोने यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान आमटे यांनी उपरोक्त उद्गार काढले.
आमटे म्हणाले की, मी आशावादी आहे. बाबा आमटे सन्स अ‍ॅण्ड प्रायव्हेट लिमिटेड अशी आमची कंपनी नाही. संस्था ही आमची आई आहे. ‘महारोगी सेवा समिती’त आमची तिसरी पिढी काम करत आहे. ज्या भागात खोबरेल तेल, दंतमंजन माहीत नव्हते, ‘जगातील सगळ्यात वाईट जागा’, असा बाबा ज्या ठिकाणाचा उल्लेख करीत होते, त्या जागेत जाऊन बाबांनी काम सुरू केले. हीच आमची फॅमिली लीगसी आहे. माझा जन्म झाला, तेव्हा डोळे उघडल्यापासून मी केवळ आईवडील आणि कुष्ठरोगीच पाहिले. नातेवाईक, वर्गमित्र हे शब्द आम्हा भावंडांना माहीत नव्हते. जेथे आनंदवन उभे आहे, त्या भागात ब्रिटिशांनी आपली वसाहत सुरू केली. विदर्भातील ब्रिटिशांची वसाहत उधळून लावण्याकरिता लोकमान्य टिळकांनी तेथे गणेशोत्सव सुरू केला होता. त्यामुळे त्या ठिकाणाला ब्रिटिशांच्या वसाहतवादाचा वारसा आहे. बाबांनी त्याच ठिकाणी काम सुरू केले. बाबा स्वातंत्र्यसैनिक होते. २०० रुपये पगारावर काम सुरू केले. त्यांनी कधी स्वत:चा फोटो छापून आणला नाही. कधी पत्रकार परिषद घेतली नाही. मी स्वत: २८ विविध विकास प्रकल्पांवर काम करीत आहे. साडेनऊ लाख कुष्ठरोग्यांवर आनंदवनने उपचार केले. आनंदवनात गेल्या अनेक वर्षांत अनेक प्रयोग केले गेले. त्यामुळे आनंदवनाचा बाबा ‘प्रयोगवन’ असा उल्लेख करायचे. प्रयोगशाळेत अपघात आहे. नैराश्य आहे. त्याचा विचार बाबांनी कधीही केला नाही. त्याच विचारांचा वारसा घेऊन आमची तिसरी पिढी कार्यरत आहे. विज्ञान म्हटले की, केवळ भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचा विचार आपल्या डोक्यात येतो. सामाजिक विज्ञानशास्त्राचा विचार का येत नाही, असा सवाल करून आमटे म्हणाले की, सामाजिक त्सुनामीचा सामना करणे, हे आव्हानात्मक असते. आमच्या आनंदवनात अनेक वेळा पु.ल. देशपांडे येत असत. आमच्या फॅमिलीचे सूत्र ‘सुंदर मी होणार नाही’, तर ‘सुंदर मी करणार’ असे आहे. आमच्या आनंदवनात रक्त देण्याघेण्याचा व्यवहार नाही. बचत गट नाही. इन्शुरन्स नाही. एकच रेशनकार्ड आहे. तरीसुद्धा भारतातील पहिले स्मार्ट व्हीलेज होण्याचा मान आम्ही मिळवला आहे. कोणीही गुरू नसताना एकलव्य धनुर्विद्या शिकला. कौरव-पांडव हे त्या काळातील आॅक्सफर्ड केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकले, असे मानले तर आमची संस्था ही एकलव्याचे विद्यापीठ आहे, असे मी मानतो, असे आमटे म्हणाले.
‘विको’ लॅबोरेटरीजचे संचालक संजीव पेंढरकर यांनी सांगितले की, वडिलांनी जेव्हा उद्योग सुरू केला, तेव्हा नोंदणीसारखी किचकट प्रक्रिया नव्हती. आता अत्यंत सूक्ष्म निकषांची पूर्तता करावी लागते. भारतात आयुर्वेदाचा उगम झाला. मात्र, केमिकल्स प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपन्या असताना आयुर्वेदिक उत्पादने तयार करून ती बाजारपेठेत यशस्वीपणे विकणे, हे आव्हानात्मक होते. अनेक उद्योजक आयुर्वेदाच्या नावाखाली विष विकत असल्याचा दावा पेंढरकर यांनी केला. आमच्यासमोर कोलगेटसारखी कंपनी असताना आम्ही तिलाच व्यवसायातील प्रतिस्पर्धी व आव्हान मानले. इतर उत्पादक कंपन्यांना आम्ही आमचे स्पर्धक समजलोच नाही. त्यामुळेच विकोची उत्पादने आजही बाजारात अव्वल आहेत. आमचे सूत्रच आयुर्वेद विथ लेटेस्ट मॉडर्न टेक्नॉलॉजी असे आहे, हे त्यांनी नमूद केले. विको ही ग्राहकांशी लॉयल आहे. याच गोष्टीची दखल घेऊन बीबीसीने ‘विको’ला नॉलेज कल्ट ब्रॅण्ड अ‍ॅवॉर्ड देऊन सन्मानित केले आहे.
सुमारे ३५ वर्षांपूर्वी ‘मॉडर्न हॉर्स सेन्स’ हे पुस्तक माझ्या वाचनात आले होते. या पुस्तकाच्या लेखकाने अनेक ‘हॉर्स सेन्स’ सांगितले आहेत. एज्युकेशन हॉर्स, हार्डवर्क हॉर्स, गुड हॉर्स, क्रिएटिव्हिटी हॉर्स असे विविध हॉर्स सांगितले आहेत. काही लोक स्वत:ची व इतरांची गुंतवणूक याचा ताळमेळ घालून व्यवसायात पुढे जातात. काही मुलांना वडिलांचा वारसा घेऊन त्या व्यवसायात पुढे जाण्यात रस नसतो. मात्र, घरातील धंद्याचा वारसा पुढे नेला, तर व्यवसायाचे बाळकडू लहानपणापासून डिनर टेबलवर मिळते. बायकोच्या माहेरचा व्यवसाय करायला काही मंडळी तयार होत नाहीत. परंतु, अशा मंडळींनी आपला ईगो बाजूला ठेवून धंद्यात लक्ष घातले पाहिजे. एका घरात पाच भाऊ असतील, तर त्या पाचही भावांच्या पोटाला सारखीच भूक असते. त्यामुळे रुपयातील केवळ २० पैसे तुझे आहेत, ही आम्हाला मिळालेली शिकवण आहे. वडील लहान भावाकडे बोट करून म्हणत असतील की, तो किती मेहनत करतो, तर दुसऱ्या भावंडांनीही त्याचे अनुकरण करावे. त्यात गैर समजू नये, असे पेंढरकर म्हणाले. आमच्या कुटुंबात ३५ सदस्य असून नागपूरला आमचे मोठे घर आहे. या घराचे स्वयंपाकघर एकच आहे. हीच पेंढरकरांची लीगसी आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली. डॉ. गिरीश जाखोटिया यांनी सांगितले की, १९१० साली राजस्थानातून माझे पणजोबा पुण्याला आले होते. माझे वडील केवळ दहावी शिकलेले आहेत. मात्र, आम्ही चारही भाऊ सीए आहोत. आजही आम्ही आमच्या वडिलांना दिवसभरातील केलेल्या कामाची माहिती देतो. फॅमिली गव्हर्नन्स व बिझनेस गव्हर्नन्स यातील संतुलन राखता आले पाहिजे. घरातील चार भावांपैकी कोणता भाऊ घराचा वारसा पुढे चालवू शकतो, हे ओळखता आले पाहिजे. रामाला लक्ष्मण आवश्यक होता. लक्ष्मणाला राम आवश्यक होता. दोघांना एकमेकांचे महत्त्व माहीत होते. बलरामाने कृष्णाला महत्त्व दिल्याने आजही द्वारका ही बलरामामुळे नाही, तर कृष्णामुळे ओळखली जाते. घरात रामाचा, तर बाहेर गेल्यावर कृष्णाचा आदर्श असला पाहिजे, असे जाखोटिया म्हणाले. कृष्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र होता. गीता लिहिली म्हणून तो ब्राह्मण होता. युद्ध केले म्हणून तो क्षत्रिय ठरला. द्वारकेच्या निर्मितीमुळे तो वैश्यांमध्ये गणला गेला, तर दुर्बलांना पाहून ज्याचे हृदय द्रवते, त्याच्या मनात सेवाभाव जागृत होत होता. त्यामुळे तो क्षुद्रही होता. कृष्णाच्या ठायी असलेल्या या चार वैशिष्ट्यांचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. बऱ्याचदा, आपण त्याचा चुकीचा अर्थ लावतो. नेमका अर्थ समजून घेतला, तर आपल्यापुढे संधीचे आकाश अमर्याद आहे. कर्तृत्वाला आकाश ठेंंगणे होऊ शकते, असा विश्वास जाखोटिया यांनी व्यक्त केला.

Web Title: Leprosy, farmer suicides, Naxalism legacy should end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.