अंबरनाथ : थकबाकीदारांना वीजबिल भरण्याची संधी देण्याच्या हेतूने महावितरणने अभय योजना राबवली. नोटाबंदीच्या निर्णयाचा फायदा पालिकेच्या मालमत्ताकराप्रमाणे महावितरणला या थकबाकीच्या माध्यमातून होईल, अशी आशा होती. मात्र, या योजनेकडे ग्राहकांनी चक्क पाठ फिरवली. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये सूट देऊनही फक्त २० लाखांचाच भरणा झाला आहे.नागरीकरणात महावितरणचे ग्राहक वाढले, मात्र त्याच वेळी वीजबिल थकवणाऱ्यांची संख्याही वाढली. त्यामुळे अशा थकबाकीदार वीजग्राहकांना थकीत बिल भरण्यासाठी महावितरणने अभय योजना आणली. यात ३० नोव्हेंबरपर्यंत थकीत वीजबिलाच्या मुद्दलावर पाच टक्के सूट दिली आहे. पुढील महिन्यापासून ही सूट रद्द केली जाणार आहे. त्यानंतर, जानेवारीपासून काही प्रमाणात दंड स्वीकारला जाईल. अंबरनाथ शहरात जवळपास सात हजार थकबाकीदार ग्राहक आहेत. त्यात ११३ औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. यांची एकत्रितरीत्या थकबाकी ५ कोटी ३८ लाखांच्या घरात आहे. बदलापूरमध्ये ही थकबाकी ५ कोटींच्या वर आहे. त्यामुळे या वसुलीसाठी महावितरणने विविध प्रचारसाधनांद्वारे या अभय योजनेची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवली. नोटाबदलाच्या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीत कोट्यवधींनी मालमत्ताकर जमा झाला. त्याच धर्तीवर महावितरणलाही थकबाकी जमा होण्याची आशा होती. मात्र, अंबरनाथमध्ये अवघी ५ लाख थकबाकी जमा झाली आहे. बदलापूरमध्ये १५ लाखांची थकबाकी वसूल झाली. त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयानंतर चालू महिन्याचे बिल भरण्यास नागरिकांनी गर्दी केली. मात्र, थकबाकीदारांनी सूट असूनही या योजनेला प्रतिसाद दिल्याचे दिसत नाही.डिसेंबरपासून टप्प्याटप्प्याने सूट कमी केली जाणार असून एप्रिलनंतर पुन्हा व्याज आणि विलंब आकार लावण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
थकबाकीदारांची महावितरणकडे पाठ
By admin | Published: November 18, 2016 2:50 AM