नवी मुंबई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत मेडिव्हिजन आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मेडिकल आणि डेंटलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता राष्ट्रीय मेडिव्हिजन २०१७ ला शनिवारी दिमाखात सुरुवात झाली. या राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेतंर्गत विद्यार्थ्यांना रुग्णसेवेचे धडे देण्यात आले, तसेच या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना गौरविण्यात आले. परिषदेतंर्गत विविध विषयांच्या कार्यशाळा तसेच चर्चासत्रांचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. भावी डॉक्टरांनी सेवा कार्य करावे या उद्देशाने शनिवारी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय क्षेत्रात कार्य करत असताना सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या डॉ.प्रतिभा आठवले (अहमदाबाद) यांना याठिकाणी सन्मानित करण्यात आले. दिवाळीच्या सुट्यांमधील एक महिना आणि उन्हाळ््याच्या सुट्यांमधील दीड महिना पूर्वांचल येथील रुग्णांची सेवा करण्याचे काम डॉ. आठवले करत आहेत. याठिकाणी असलेल्या आदिवासी पाड्यांमधील कर्करोग पीडितांवर मोफत उपचार करतात. याठिकाणी रुग्णसेवा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे येण्याचे आवाहन डॉ. आठवले यांनी यावेळी केले. कुषोषण टाळण्यासाठी काय करता येईल, डब्ल्यूएचओच्या संकल्पनेवर आधारित दिव्यांग विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे कसे नेता येईल या विषयांवर २००हून अधिक विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रके तसेच प्रबंध सादर करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध संकल्पनांचे तज्ज्ञांकडून स्वागत करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी गरजूंपर्यंत पोहोचून सेवा पुरविणे आवश्यक असल्याचा मोलाचा सल्ला तज्ज्ञांमार्फत देण्यात आला. नाव, प्रसिध्दी, पैसा याकरिता काम न करता रुग्णांची सेवा करून रोग बरे करण्याचा ध्यास घेणे आवश्यक असून त्यादृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. परिषदेला राज्याच्या विविध भागातील मेडिकल तसेच दंतचिकित्सा विभागाचे विद्यार्थी आले आहेत. भविष्यात चांगले डॉक्टर्स घडविण्यासाठी याठिकाणी विविध कार्यशाळा राबविण्यात आल्या. टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉ. जान्हवी केदारे यांनीही रुग्ण आणि डॉक्टर यांचे नाते कसे असावे याविषयी मार्गदर्शन केले. दंतचिकित्सेच्या विद्यार्थ्यांकरिता स्माईल डिझाइनिंग या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दंततज्ज्ञ डॉ.संदेश मयेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, मेडिव्हिजनचे संयोजक रवी शुक्ला, चिंतन चौधरी, प्रफुल्ल आकांत, मेडिव्हिजनचे अखिल भारतीय प्रमुख यदुनाथ देशपांडे, डी.वाय. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्याम मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांना रुग्णसेवेचे धडे
By admin | Published: April 24, 2017 2:37 AM