नवी मुंबई : लग्नात हळद लावण्याच्या कार्यक्रमाला आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे अनेकदा प्रत्यक्ष लग्नापेक्षा हळदीचा समारंभच धूमधडाक्यात केला जातो. त्याचप्रमाणे प्री वेडिंग फोटोशूट हा ट्रेंडसुद्धा अलीकडच्या काळात चांगलाच रूजला आहे. एकूणच लग्नसमारंभाला आता इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाल्याने हळदी, मेहंदी, संगीत तसेच प्री-वेडिंग फोटोग्राफी या नवीन कार्यक्रमांची भर पडली आहे. नवी मुंबई, पनवेल आणि उरण तालुक्यात येथील मूळ रहिवासी असलेलेल्या आगरी-कोळी समाजाची संख्या मोठी आहे. या समाजात पूर्वीपासूनच लग्नात हळदीला महत्व राहिलेले आहे. त्यामुळेच लग्नापेक्षा अधिक खर्च हळदी समारंभावर केला जातो. मात्र, मागील दोन दशकात हा समाज सुशिक्षित झाला आहे. हळदीवर केला जाणारा भरमसाठ खर्च त्यांना अनाठायी वाटू लागला आहे. यासंदर्भात समाजात जनजागृती केली जात आहे. मात्र, त्यानंतरसुद्धा अनेक गावांत हळदीचा धूमधडाका सुरूच आहे. आता यात डेस्टिनेशन वेडिंग, मेहंदी, संगीत आणि प्री वेडिंग फोटोग्राफीची भर पडली आहे.
हळदीचा खर्च जोरात नवी मुंबईतील आगरी -कोळी समाजातच पूर्वी धूमधडाक्यात हळदी समारंभ करण्याची प्रथा होती. मात्र, आता त्याला सार्वत्रिक स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे लग्नाला आले नाही तरी चालेल, परंतु हळदीला येण्याचे आग्राहाचे निमंत्रण दिले जाते. कारण हळदी समारंभात खानपान तसेच नृत्याचा मनमुराद आनंद लुटता येतो. त्यातच नवरा मुलगा आणि मुलीचा थाट काही औरच असतो. त्यामुळे हळदी समारंभाच्या खर्चात कोणतीही कसर राहणार नाही, याची काळजी वधू व वर पित्यांच्या घरच्या मंडळींकडून घेतली जाते.
प्री वेडिंग फोटोग्राफी लाखात प्री वेडिंग फोटोग्राफीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यासाठी लाखो रूपये खर्च केले जातात. कारण या फोटोग्राफीसाठी विशेष डेस्टिनेशन निवडले जाते. त्यासाठीचा खर्च मोठा असतो. वधू-वरांच्या बजेटनुसार फोटोग्राफीचे स्थळ निश्चित केले जाते. त्यानुसार २ ते १५ लाख रूपये खर्च आकारला जातो.
प्री वेंडिंग आता ट्रेंड झाला आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या आर्थिक क्षमतेनुसार प्रीवेडिंग फोटोग्राफी करतो. अलिबागजवळील समुद्रकिनारा, कोकणातील दापोली, आंजुर्ले, आसूदगाव, सिंधुदुर्ग समुद्र किनारपट्टी आदी स्थळांना प्री वेडिंग फोटोग्राफीला पसंती दिली जात आहे. त्याचप्रमाणे कर्जत, लोणावळा तसेच खंडाळा येथील रिसॉर्ट, फार्महाऊस, या परिसरातील धबधबे आदी स्थळांनासुद्धा फोटोग्राफीसाठी पसंती दिली जात असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.