नवी मुंबई : माथाडी कामगार चळवळीमध्ये गुंड प्रवृत्ती वाढल्या आहेत. दुष्ट प्रवृत्तींना शासनाने वेळेत आळा घालावा. चळवळीमध्ये शिरलेल्या प्रवृत्तींविरोधात आवाज उठविणार आहोत. माथाडी कायदा टिकविण्यासाठी व कामगारांच्या हितासाठी लढताना आमचा मुडदा पडला तरी घाबरत नाही, असे मत आमदार नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी नरेंद्र पाटील यांनी चळवळीचा गैरफायदा घेणाऱ्या बोगस संघटना व त्यांच्या स्वयंघोषित नेत्यांवर कडाडून टीका केली. कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अण्णासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे निर्माण झालेल्या कायद्याचा दुरुपयोग सुरू आहे. अनेक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती प्रामाणिक कामगारांना त्रास देत आहेत. अशा दुष्ट प्रवृत्तींना शासनाने वेळेत आळा घालावा. कायद्याचा दुरुपयोग करून दहशत निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात आवाज उठविणार असून, या लढ्यात वेळप्रसंगी आमचा मुडदा पडला तरी घाबरत नाही, असे मत व्यक्त केले. कामगारांची घरे, लेव्हीचा प्रश्न सोडविण्यात यावा. मापाडी कामगारांची थकीत रक्कम मिळावी. माथाडी बोर्डांची रचना करण्यात यावी. बोर्डामध्ये नोकरभरती करताना माथाडींच्या मुलांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी केली. गणेश नाईक यांनीही अण्णासाहेब पाटील यांच्या योगदानामुळे कामगार सुरक्षित असल्याचे मत व्यक्त केले. अण्णासाहेब असते तर देशातील प्रत्येक मंडईमध्ये माथाडी कायद्याची अंमलबजावणी झाली असते, असे मत व्यक्त केले. नवी मुंबईमध्ये कामगारांच्या व प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर कारवाई करण्याचे षड्यंत्र प्रशासनाने आखले असल्याचे मत व्यक्त केले. नाव न घेता आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. माथाडी नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनीही उद्योग टिकविताना कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष केले जावू नये, असे मत व्यक्त केले. माथाडी बोर्डांची रचना, घरांचा प्रश्न व इतर काही प्रश्न सोडविण्यासाठी कामगार मंत्र्यांनी वेळ द्यावा. महिन्यातून एक दिवस बैठकीला वेळ दिला व प्रशासनाला योग्य आदेश दिले तरी सर्व प्रश्न तत्काळ सुटतील, असे मत व्यक्त केले.मापाडी कामगारांची थकीत रक्कम देण्याचे शासनाने मान्य केले आहे, पण ती फाईल विविध अधिकाऱ्यांकडे फिरविली जात आहे. कंपन्यांमध्ये माथाडी कायदा लागू होवू नये यासाठी मालक गुंडांचा वापर करत आहेत. आम्ही त्यांना घाबरत नाही. त्यांना वठणीवर आणण्याची आमची ताकद आहे, पण आम्ही कायद्याच्या मार्गाचा अवलंब करत आहोत. आम्ही ठरविले तर राज्यातील अन्नधान्याचा पुरवठा एका दिवसात बंद करू शकतो. एवढी ताकद कामगारांची आहे. पण आंदोलन न करता चर्चेतून प्रश्न सुटावे अशी आमची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दुष्ट प्रवृत्तींविरोधात लढा देणार
By admin | Published: March 24, 2017 1:19 AM