- नारायण जाधव
ठाणे : चटईक्षेत्र चोरून कोट्यवधींची लूट करणाऱ्या घणसोलीतील अॅटलान्टिस टॉवरच्या विकासकाच्या अडचणीत आणखी वाढल्या आहेत.
नवी मुंबई महापालिकेने त्यामधील घरे आणि दुकाने खरेदी करूनयेत, असे आवाहन केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर आता त्या विरोधात मुद्रांक व नोंदणी विभागाच्या दुय्यम निंबधकांनाही त्यातील सदनिका आणि घरांच्या खरेदी-विक्री वा पुनर्विक्रीची नोंदणी करू नये, असे पत्र दिले आहे. शिवाय पालिकेच्या निर्णयाविरोधात विकासकाने न्यायालयात धाव घेऊन स्थगिती आणू नये, म्हणून उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यासाठीही संबधित विभागास पत्र दिले आहे.
राज्यात नव्याने अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, त्यात घरे घेऊन सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून अशा बांधकामांच्या याद्या संबंधित नियोजन प्राधिकरणांनी दुय्यम निबंधकांकडे द्याव्यात, तसेच त्या आपल्या संकेतस्थळांवर आणि वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्याचे आदेश नगरविकास विभागाने ३ मे २०१८ रोजी दिले होते. त्यानुसारच, अॅटलान्टिसविरोधात ऐरोली येथील दुय्यम निबधकांच्या कार्यालयात तक्रार केली असल्याचे, नवी मुंबई महापालिकेचे घणसोली विभागाचे सहायक आयुक्त दत्तात्रेय नागरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याच आदेशान्वये आयुक्त रामास्वामी एन. यांच्या निर्देशांनुसार उपायुक्त अमरीश पत्नीगिरे यांनी न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याबाबत संबंधित विभागाला पत्र दिले असल्याचे नागरे यांनी स्पष्ट केले.नगररचना अधिकारी हादरलेविकासकाच्या अनधिकृत बांधकामास हरकत न घेता उलट, बिनदिक्कत ओसी देऊन त्यात घरे, दुकाने घेणाºयांची फसवणूक करण्यास हातभार लावल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध होताच नगररचना खात्याचे अधिकारी पुरते हादरले आहेत. कारण आयुक्त रामास्वामी एन. हे कठोर अधिकारी असल्याने त्यांच्यावर कारवाई निश्चित मानली जात आहे.