सायबर सिटी प्रदूषणाच्या विळख्यात, वायुप्रदूषणाने ओलांडली धोक्याची पातळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:21 AM2019-11-12T00:21:10+5:302019-11-12T00:21:14+5:30
माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई या सायबर सिटीला प्रदूषणाचा विळखा पडला आहे.
नवी मुंबई : माहिती व तंत्रज्ञानाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई या सायबर सिटीला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. हवेतील धुलीकणांत वाढ झाली असून वायुप्रदूषणानेसुद्धा धोक्याची पातळी ओलांडल्याचे दिसून आले आहे. हवेतील धुलीकणांत वाढ झाल्याने शहरवासीयांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्याचे मोठे आव्हान शहरवासीयांसमोर उभे ठाकले आहे.
केंद्र शासनाशी संलग्न असलेल्या सफर इंडिया एअर क्लॉलिटी सर्व्हिस या संस्थेने गेल्या महिन्यात केलेल्या सर्वेक्षणातून नवी मुंबईतील वायुप्रदूषणात कमालीची वाढ झाल्याचे नमूद केले आहे. सायन-पनवेल व ठाणे-बेलापूर मार्गावरील वाढलेली वाहतूक, टीटीसी औद्योगिक वसाहत व तळोजा एमआयडीसीतील कारखानदारांकडून केला जाणारा हलगर्जीपणा तसेच जेएनपीटीकडे जाणाºया अवजड वाहनांची धडधड, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व मेट्रो प्रकल्पासाठी सुरू असलेले खोदकाम आदी कारणांमुळे शहरातील वायू व ध्वनिप्रदूषणात वाढ झाल्याचे समोर आले आहे.
नवी मुंबईतील प्रदूषणाची पातळी वाढल्याचे हरित लवादाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. असे असतानाही या वर्षीच्या पर्यावरण अहवालात नवी मुंबई महापालिकेने मात्र प्रदूषणाची पातळी खालावल्याचे नमूद केले आहे. तसेच आरोग्य निर्देशांकातही सुधारणा दिसत असल्याचे म्हटले आहे. मात्र रहिवासी क्षेत्रात ध्वनिप्रदूषणाची पातळी वाढल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, वातावरणातील बदलाचासुद्धा प्रदूषणावर नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. सकाळी थंड आणि दुपारी उष्णता यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्दी, खोकला, ताप व अंगदुखी आदी आजार बळावल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.
>वाहनांच्या वाढत्या संख्येचा फटका
मागील दोन दशकांत नवी मुंबई शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. त्यामुळे येथील उद्योगधंदे वाढीस लागले आहेत. आयटी उद्योगाचे जाळे पसरल्याने रोजगार वाढले आहेत. शहरवासीयांचे दरडोई उत्पन्नसुद्धा वाढल्याने येथील रहिवाशांचे जीवनमानसुद्धा उंचावले आहे. त्यामुळे इतर सुविधांसह वाहन ही चैनीची बाब बनली आहे. त्याचा परिणाम म्हणून शहरात वाहनांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे वाहतूककोंडीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये कृषी मालाच्या दिवसाला शेकडो गाड्या येतात. जेएनपीटी येथे जाणाºया कंटेनरचा मार्ग नवी मुंबईतूनच जातो. सायन-पनवेल महामार्गावर दिवसाला लाखो वाहने ये-जा करतात. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून प्रक्रिया न करता खाडीत सोडले जाणारे सांडपाणी आदी प्रकारामुळे शहराच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचा निष्कर्ष पर्यावरणप्रेमींकडून काढला जात आहे.
>ध्वनिप्रदूषणाचीही धोकादायक पातळी
शांतता क्षेत्रातील सर्व ठिकाणांची ध्वनिप्रदूषण मर्यादा ५० डेसिबल असताना ती सर्व ठिकाणी ओलांडताना दिसत आहे. घणसोली गाव, ऐरोली सेक्टर १८ व १९ येथे ६१ डेसिबल, नेरूळ सेक्टर ९ येथे ६०, वाशी विभागात ५९ डेसिबल ध्वनिप्रदूषण नोंदविण्यात आले आहे. मागील वर्षी ध्वनिप्रदूषण पातळी ही ६५ ते ६९ डेसिबलइतकी होती.
वाहतुकीच्या ठिकाणांवर सरासरी ध्वनिप्रदूषण पातळी ही ६१ ते ६७ डेसिबल एवढी नोंदवण्यात आली आहे. यात महापे पुलावर सर्वाधिक ध्वनिप्रदूषण ६७ डेसिबल, बेलापूर, दिघा, वाशी, जुहूगाव या ठिकाणी ६५ डेसिबल इतकी नोंद झालेली आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठ नेरूळ सेक्टर ७ येथे ६१ डेसिबलएवढे ध्वनिप्रदूषण नोंदविले आहे.
>पनवेल परिसर प्रदूषणाच्या विळख्यात
पनवेल परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाची समस्या डोकेदुखी ठरत आहे. तळोजा एमआयडीसीतील कारखाने हे प्रदूषणकारी असल्याने त्याचा त्रास थेट सिडको वसाहतींना होत आहे. सकाळी, सायंकाळी सोडण्यात येणाºया या विषारी वायूमुळे शहरवासीयांचा जीव गुदमरत आहे.
वायुप्रदूषणाबरोबरच जलप्रदूषणाची समस्याही गंभीर असून कासाडी नदीत परिसरातील कारखान्यांमधून सांडपाणी सोडण्यात येत असल्याने पात्र दूषित झाले आहे. तळोजातील रासायनिक कारखान्यांतून मोठ्या प्रमाणात विषारी वायू हवेत सोडले जात असल्याने त्याचा त्रास परिसरातील ग्रामस्थांना होतो. नावडे, पेंधर, पडघा, नेवाळी, चिध्रण, घोट, घोटकॅम्प, तळोजा, कळंबोली शहर, नावडे नवीन सिडको वसाहत येथील रहिवाशांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत.