नवी मुंबई - उसन्या घेतलेल्या २९ हजार ५०० रुपयांसाठी दांपत्याला ५ वर्षे गुलामगिरीत ठेवून राबवल्याची घटना समोर आली आहे. दांपत्याच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्यांना उसने दिलेल्या पैशाच्या बदल्यात वीटभट्टी कामगार त्यांना राबवून घेत होते. त्यातच काम न केल्यास अमानुष मारहाण देखील केल्याने अखेर या प्रकरणाला वाचा फुटली आहे.
पनवेल परिसरातील नेवाळी गावातील वीटभट्टीच्या ठिकाणी ही घटना घडली आहे. याप्रकरणी वीटभट्टी चालवणाऱ्या बबन काथारा याच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात झोपडीत राहणाऱ्या दत्तू हिलम (४५) याने काही वर्षांपूर्वी बबनकडून टप्प्या टप्प्याने एकूण २९ हजार ५०० रुपये उसने घेतले होते. मुलाच्या लग्नासह इतर कारणांसाठी दांपत्याने हि उचल घेतली होती. त्या बदल्यात बबन याने २०१९ मध्ये दोघा पती पत्नीला त्याच्या वीटभट्टीवर कामाला ठेवून घेतले होते. त्यांना केवळ जेवण बनवायचे वेळेत रिकामे सोडले जात होते. शिवाय कामावर गैरहजर राहिल्यास अमानुष मारहाण केली जायची.
१ मार्चला दत्तूची तब्बेत ठीक नसल्याने कामावर न आल्याच्या रागात बबन याने फावड्याने त्याला मारहाण केली होती. यामध्ये रक्तबंबाळ होऊनही अशिक्षित असल्याने व बबनच्या दहशतीमुळे जखमी अवस्थेतच ते झोपडीत पडून होता. याची माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेचे रामदास वाघ, हिरामण नाईक यांनी त्यांना पोलिसांकडे नेले असता पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार बबन काथारा याच्यावर बंधबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम अंतर्गत खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.