नवी मुंबई : वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या व इतर नियम तोडणारांचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. वाहतूक पोलीस व आरटीओने संयुक्त मोहीम राबवून धडक कारवाई सुरू केली असून, अनेकांना परवाना रद्द करण्यासाठीची नोटीस दिली आहे. नवी मुंबईमध्ये वाहनचालकांमध्ये बेशिस्तपणा वाढत आहे. नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, मोटारसायकल चालविताना हेल्मेटचा वापर न करणारांचे प्रमाण वाढत आहे. वाहतूक पोलीस नियमितपणे कारवाई करतात. परंतु २०० रुपयांचा दंड भरून पुन्हा चालक नियम तोडत असल्याचे निदर्शनास येऊ लागले होते. यामुळे आरटीओ व वाहतूक पोलिसांनी नियम तोडणारांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सानपाडा रेल्वे स्टेशनसमोर संयुक्त मोहीम राबविण्यात आली. मोटारसायकल चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या चालकांची लायसन्स ताब्यात घेतले आहे. संबंधितांना मोटार वाहतूक कायदा १९८८ चे कलम १९ (१) अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीने उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे स्वत: उपस्थित राहून लासन्स रद्द का करू नये, यासाठीचे स्पष्टीकरण देणे बंधनकारक आहे. सुनावणीसाठी उपस्थित राहिले नाहीत तर लायसन्स कायमस्वरूपी रद्द केले जाणार आहे. वाहतुकीचे नियम हे कारवाईसाठी नाही तर सुरक्षिततेसाठी आहेत. नागरिकांनी स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन केले पाहिजे. याविषयी वारंवार जनजागृती करून व दंडात्मक कारवाई केल्यानंतरही वाहनचालक नियम तोडत आहेत. वाहन चालविताना मोबाइलवर बोलल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळेच पोलिसांनी कडक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. यापुढे नागरिकांनी नियम पाळले नाहीत तर त्यांचा परवानाच रद्द केला जाणार आहे. यामुळे चालकांनी तंतोतंत नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक अधिकारी संजय धायगुडे यांनी केले आहे. कारवाई केलेल्या काही चालकांना त्यांनी स्वत: लायसन्स रद्द करण्यासाठीची नोटीस दिली आहे. ही कारवाई नियमितपणे सुरूच ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
नियम तोडणाऱ्यांचा परवाना रद्द
By admin | Published: January 07, 2016 1:02 AM