लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सतीश हावरे यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात सोमवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मॅगसेसे पुरस्कार विजेते, तसेच जलपुरुष अशी ओळख असलेल्या राजेंद्र सिंह यांना २०१७ चा सामाजिक सेवा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सिंह यांची तब्येत बरी नसल्याकारणाने त्यांचे सुपुत्र मौलिक सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हावरे फाउंडेशनच्या वतीने कार्याची दखल घेत जीवनगौरव पुरस्काराने गौरविल्याने वडिलांचा हा पुरस्कार ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे प्रतिपादन मौलिक सिंह यांनी केले. जलस्रोतांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून त्यादृष्टीने सकारात्मक पाऊल उचलणे आवश्यक असल्याची माहिती सिंह यांनी दिली. नद्यांचे प्रदूषण रोखणे आवश्यक असून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याचेही सिंह यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या व्यक्तींचा तसेच त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी पद्मभूषण डॉ. विजय भटकर तसेच ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. हावरे फाउंडेशनच्या वतीने सामाजिक कार्यात पुढाकार घेत गरजूंना आधार दिला जातो. यावेळी पाण्याचे महत्त्व जाणून प्रत्येकाने पाण्याचा जपून वापर करण्याचा सल्ला भटकर यांनी दिला. जलसंपत्ती टिकविण्यासाठी नागरिकांनी स्वत:पासून सुरुवात करावी असेही भटकर यांनी सांगितले. समाजातील घटकांना एकत्र जोडत निराधारांना आधार देण्याचे कार्य हावरे फाउंडेशनच्या वतीने केले जात असल्याचे प्रतिपादन करत सिंधुतार्इंनी कार्याचे कौतुक केले. या प्रसंगी अमरावती येथील प्रश्नचिन्ह संस्थेचे संचालक मतीन भोसले यांना सन्मानित करण्यात आले. मतीन भोसले यांच्या नेतृत्वाखाली चालविल्या जाणाऱ्या संस्थेच्या आदिवासी आश्रमशाळेला हावरे फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात देण्यात आला असून तेथील मुलांकरिता वसतिगृहे बांधून दिली जाणार आहेत. यावेळी चित्रकला व निबंध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुरेश हावरे, उज्ज्वला हावरे, संजय हावरे, प्रवीण हावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
जलपुरुष राजेंद्र सिंह यांना जीवनगौरव
By admin | Published: May 09, 2017 1:33 AM