नवी मुंबई : हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. महापे येथे २०१७ मध्ये एका हत्ये प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. बहिणीच्या गैरकृत्याची माहिती त्याला समजल्याने तो इतरांना सांगेल या भीतीने नोकरीच्या बहाण्याने त्याला नवी मुंबईत आणून हत्या करण्यात आली होती.
महापे येथे एका टेलरच्या दुकानात हा प्रकार घडला होता. जून २०१७ मध्ये टेलरच्या दुकानात मोहम्मद जसीम सम्मो खान याचा मृतदेह आढळून आला होता. तर त्याच ठिकाणी काम करणारा एहसान रब्बान खान हा मात्र घटनेनंतर बेपत्ता झाला होता. तिथल्या टेलरच्या दुकानात काम करणाऱ्या एहसान यानेच मोहम्मद जसीम याला बिहार येथून कामाच्या बहाण्याने आणले होते. घटनेच्या दिवशी दोघेच टेलरच्या दुकानात असताना एहसान याने मोहम्मद जसीम खान याचा गळा आवळून हत्या करून दुकान बंद करून पळ काढला होता. हा प्रकार उघड झाल्यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सबळ पुरावे जमा केले होते. त्याद्वारे एहसान याला बिहार मधून अटक करण्यात आली होती. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरु असताना विद्यमान वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर, निरीक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक वैभव नन्नावरे, हवालदार प्रभाकर महाजन व भगवान लांडे यांनी न्यायालयापुढे सबळ पुरावे मांडले होते. त्यानुसार सोमवारी खटल्याची अंतिम सुनावणी झाली असता न्यायाधीश पराग साने यांनी एहसान याला जन्मठेपेची शिक्षा व दोन हजाराचा दंड सुनावलं आहे. गुन्ह्यानंतरचा योग्य तपास व त्याची न्यायालयापुढे पोलिसांनी योग्य मांडणी केल्याने दोषीला शिक्षा लागू शकली आहे.