कळंबोलीमधील जनजीवन झाले सुरळीत; नागरिकांनी दाखविली निर्भयता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:16 PM2019-06-18T23:16:04+5:302019-06-18T23:17:12+5:30
सुरक्षा यंत्रणेवर व्यक्त केला विश्वास; सर्व शाळा निर्भय वातावरणात सुरू
- अरुणकुमार मेहेत्रे
पनवेल : कळंबोली वसाहतीमध्ये अगदी सुधागड स्कूलच्या बाजूला अज्ञात व्यक्तीने बॉम्बसदृश वस्तू ठेवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेची देशभरात दखल घेतली गेली. तर्क-वितर्क लावले गेले. मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा बाहेरून आली. माध्यमांवर वेगळ्या बातम्या या बाबत आल्या. असे असतानाही कळंबोलीकरांनी आपला संयम ढळू दिला नाही. इतकी मोठी घटना घडूनही जनजीवन विस्कळीत झाले नाही. यामुळे कळंबोलीकरांची निर्भयता पुढे आली, असे म्हणता येईल.
कळंबोली वसाहत ही मोठी नागरी वसाहत आहे. लोकसंख्या ही दोन लाखांच्या पुढे आहे. सिडकोच्या बिल्डिंगबरोबरच खासगी घरेही कॉलनीत आहेत. पनवेल-सायन त्याचबरोबर मुंब्रा महामार्ग वसाहतीपासून जातात. बाजूला खूप मोठे लोह-पोलाद मार्केट आहेत. ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या वसाहतीमध्ये शाळासुद्धा आहेत. सांगण्याचे तात्पर्य इतकेच कळंबोली गजबजलेले आहे. आणि नेमके याच वसाहतीमध्ये बॉम्बसदृश वस्तू एका हातगाडीवर ठेवण्यात आली. ही हातगाडी काही तास रस्त्यावर उभी होती तरीसुद्धा ते याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे कळंबोलीकरांना अंतर्गत सुरक्षेची हमी वाटते. सुधागड हायस्कूलच्या सुरक्षारक्षकाने ही वस्तू निदर्शनास आणून दिली. त्यानंतर नवी मुंबईचे बॉम्बशोधक पथक त्या ठिकाणी आले. फायर ब्रिगेडच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत ही वस्तू निकामी करण्याचा प्रयत्न केला गेला. पोलीस दलाचे प्रयत्न सुरू असताना या ठिकाणी कळंबोलीकरांनी काही प्रमाणात गर्दी केली होती; परंतु त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही भीती दिसत नव्हती. आमदार, नगरसेवक तसेच राजकीय मंडळी त्या ठिकाणी आली. त्यांचा व नागरिकांचा सुरक्षा यंत्रणेला कोणताही अडथळा झाला नाही. पोलीस यंत्रणेच्या कामात बाधा येईल असले कोणतेही वर्तन नागरिकांनी केले नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, सुधागड हायस्कूलच्या बाजूला बाजारपेठ आहे. दोन्ही बाजूंनी रांगेत दुकाने आहेत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी बॉम्बसदृश वस्तू निकामी करण्याचे काम सुरू होते.
एवढी मोठी घटना या परिसरात होऊनही सर्व दुकाने सुरू होती. रस्त्यांवरून लोकांची ये-जा सुरू होती. कुठेही वाहने अडवण्याची वेळ आली नाही. ज्या सुधागड शाळेसमोर ही बॉम्बसदृश वस्तू आढळली तिथेही कोणतीही गडबड दिसली नाही. नियमित वेळेतच शाळा सोडण्यात आली. मंगळवारी दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतिरिक्त महासंचालक देवेन भारती यांच्यासह अनेक बडे अधिकारी कळंबोलीत आले. त्याचबरोबर वसाहतीला एक प्रकारे लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असताना कळंबोलीकरांनी दोन्ही दिवस नियमित काम सुरू ठेवले.
ज्याने कोणी हा प्रकार केला असेल त्याला आमची पोलीस यंत्रणा नक्की शोधून काढेल. त्याचबरोबर या प्रकरणाचा छडाही लावेल. अशा या घटनांना संयम, एकतेने सामोरे जाणे हे आपल्या लोकशाहीला अभिप्रेत आहे आणि सोमवारी कळंबोलीकरांनी या गोष्टीचा साक्षात्कार दिला.
- प्रशांत रणवरे,अध्यक्ष, कळंबोली
विकास समिती
सोमवारी जी घटना घडली त्याबाबत अद्याप बºयाच गोष्टी समोर येणे बाकी आहे. लवकरच याबाबतची वस्तुस्थिती तपास यंत्रणा समोर आणतील याबाबत कळंबोलीतील नागरिक म्हणून मला दृढ विश्वास आहे. राहिला दुसरा मुद्दा भयाचा तर आम्ही अशा भ्याड गोष्टींना भीत नाही आणि त्यांना भीक घालत नाही.
- किशोर ठोंबरे, रहिवासी कळंबोली
सोमवारी कळंबोलीत जी वस्तू सापडली ती नेमकी काय होती, याबाबत तपास यंत्रणा जास्त काही सांगू शकतील; परंतु दोन्ही दिवस कळंबोली वसाहतीतील नागरिकांमध्ये संयम दिसून आला आणि जबाबदार नागरिकांचे देशाप्रती हेच कर्तव्य असणे आवश्यक आहे. यावरून आपल्या सुरक्षा आणि तपास यंत्रणांवर फक्त विश्वास असल्याचे स्पष्ट होते.
- अॅड. श्रीनिवास क्षीरसागर, कळंबोली