नवी मुंबई : महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे घणसोली परिसरातील पाच गावांतील नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. रविवारी पावसामुळे रस्त्यावरील उघड्या केबल्समधून धूर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली होती.पावसाळा सुरू झाल्यापासून परिसरातील विजेचा लपंडाव सुरूच आहे. गावातील केबलच्या माध्यमातून इंटरनेट वापर करणाऱ्या लोकांना आणि महापालिका, नागरी आरोग्य केंद्र, टपाल कार्यालय, व्यावसायिक, रु ग्णालये, दुकानदार, तसेच डॉक्टर, वकील तसेच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यातच पाण्याचे मोटार पंप बंद असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. हा वीज महावितरण कंपनीचा खेळखंडोबा त्वरित न थांबल्यास ग्रामस्थ महावितरणच्या ऐरोली कार्यालयाला धडक देतील, असा इशारा देण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने कोट्यवधी रु पये खर्चून नवी मुंबईत भूमिगत केबल्स टाकलेल्या आहेत. त्यापैकी घणसोली एफ विभाग परिसरात आतापर्यंत या परिसरात ९0 टक्के विद्युत तारा भूमिगत करण्याचे काम पूर्ण झाले असून, १0 टक्के तारा ओव्हरहेड खांबावरून आल्यामुळे या तारा तुटण्याच्या प्रकारात वाढ होत आहे.भूमिगत करण्यात आलेल्या मोठमोठ्या उच्च दाबाचा विद्युत पुरवठा करणाºया केबल्स आता थेट बाहेर दिसत असल्यामुळे रस्त्यावरून चालताना किंवा वाहने नेताना याच उघड्या केबल्सवरून न्यावे लागत आहे. घणसोली गावात चिंचआळी येथे गोविंद पाटील चाळीसमोर तर रस्त्यावर उच्च दाब असलेल्या ओव्हरहेड उघड्या तारा जमिनीपासून केवळ तीन ते चार फूट उंचीपर्यंत लोंबकळत असल्याने या उघड्या तारांचा शॉक लागून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची दाट शक्यता असल्याने महावितरण कंपनीने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन तारांची समस्या त्वरित दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने महावितरणकडे करण्यात आली आहे.
वीजवाहिनीमुळे जीवाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 2:47 AM