पनवेल : शहरात महत्त्वाच्या ठिकाणी एलईडी दिवे बसविण्याचा प्रस्ताव पास होवून एजन्सीही नियुक्त करण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यावर दिवे बसविण्याचे काम दिवाळीतच सुरू झाले असून सध्या याठिकाणी एलईडी दिवे लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे विजेची बचत होणार आहेच त्याचबरोबर रस्त्यावर उजेडही चांगला पडत आहे.शहरातील सर्व दिवे टप्प्याटप्प्याने बदलण्यात येणार असून जुनाट यंत्रणा बंद करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने गेल्या वर्षीच पावले टाकली होती. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला गेल्या वर्षी हिरवा कंदील मिळाल्यानंतर हा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला होता. या विभागातील अधिकाऱ्यांकडून प्रस्तावाच्या सर्व बाबी तपासल्या. त्यानंतर हा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अवलोकनार्थ पाठवण्यात आला. त्यांच्याकडून अहवाल पुन्हा एमजेपीकडे आला त्यानंतर पालिकेला मंजुरीचे पत्र प्राप्त झाले. त्यानंतर लागलीच निविदा पध्दतीने एजेल ही नामांकित कंपनी नियुक्त करण्यात आली. या एजन्सीने जवळपास ३५० दिवे मुख्य रस्त्यावर बसवले असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी पालिकेला देण्यात आला असल्याने बीओटी प्रस्ताव मागे पडला. पनवेल शहरात सुमारे ५० कि.मी. अंतराचे रस्ते असून या ठिकाणी मेटल हालाईटचे १७०० दिवे आहेत. त्याकरिता ४.५० लाख इतके वीजबिल येत असून त्यांचा मेंटनन्स खर्चही अधिक आहे. त्याचा आर्थिक भुर्दंड पालिकेला भरावा लागत आहे. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी १५ हायमास्टही आहेत. (वार्ताहर)
पनवेल शहरात एलईडीचा उजेड
By admin | Published: November 23, 2015 1:23 AM