जात पडताळणी कार्यालयावरील भार हलका

By admin | Published: February 14, 2017 04:27 AM2017-02-14T04:27:44+5:302017-02-14T04:27:44+5:30

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण भवन येथील जात पडताळणी कार्यालयाकडे जात पडताळणीसाठी ३४६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

Lightening of caste verification office | जात पडताळणी कार्यालयावरील भार हलका

जात पडताळणी कार्यालयावरील भार हलका

Next

सूर्यकांत वाघमारे / नवी मुंबई
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण भवन येथील जात पडताळणी कार्यालयाकडे जात पडताळणीसाठी ३४६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यंदा प्रथमच शासन निर्णयानुसार केवळ विजयी उमेदवारालाच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करायचे आहे. यामुळे जात पडताळणी कार्यालयावरील कामाचा ७० टक्के भार हलका झाला आहे.
राज्यात महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. कोकण परिक्षेत्रात देखील जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावणाऱ्या उमेदवारांना यंदा अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र जोडण्याच्या प्रक्रियेतून सुटका मिळालेली आहे. यामुळे इच्छुक उमेदवार जितके सुखावले आहेत, तितकाच आनंद जात पडताळणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील झाला आहे. यापूर्वी उमेदवारी अर्ज सादर करतानाच जात पडताळणी प्रमाणपत्र जोडावे लागत होते. यामुळे जात पडताळणी कार्यालयाकडे शेकडो अर्ज दाखल व्हायचे. हे सर्व अर्ज अवघ्या १० ते १५ दिवसांत निकाली काढण्याच्या कामाचा अतिरिक्त ताण कर्मचाऱ्यांवर पडायचा. यामध्ये त्रुटी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. शिवाय विद्यार्थ्यांकडून आलेले अर्ज देखील निश्चित मुदतीत काढण्याचे काम करावे लागायचे.
परंतु यंदा प्रथमच झालेल्या शासन निर्णयाने उमेदवारांइतकाच जात पडताळणी कार्यालयातील कर्मचारी देखील सुखावला आहे. गत महिन्यात झालेल्या शासन निर्णयानुसार निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारालाच सहा महिन्यापर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. यामुळे जात पडताळणी कार्यालयावरील निवडणूक काळातला कामाचा ७० टक्के भार हलका झाला आहे. हेच चित्र कोकण भवन येथील जिल्हा जात पडताळणी कार्यालयात पहायला मिळत आहे. एरवी निवडणूक काळात नेहमी गजबजलेल्या या कार्यालय आवारातला गर्दीचा ओस घटला आहे. शिवाय निवडणूक काळात या कार्यालयाकडे जात पडताळणीसाठी सुमारे १२०० पेक्षा जास्त अर्ज प्राप्त होत असत. यंदा मात्र त्यात घट होवून रायगडमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवघे ३४६ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी फक्त विजयी उमेदवारांचेच अर्ज निकाली काढले जाणार आहेत. ही प्रक्रिया देखील निकालानंतर सुरू होणार आहे. विजयी उमेदवाराने निकालाचे प्रमाणपत्र जात पडताळणी कार्यालयाकडे सादर केल्यानंतरच या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.
शैक्षणिक कारणासाठी विद्यार्थ्यांकडून आलेल्या अर्जांपेक्षा निवडणुकीसाठी आलेले अर्ज निकाली काढण्यात कर्मचाऱ्यांची दमछाक व्हायची. अल्प कालावधीत हे अर्ज निकाली काढावे लागायचे.

Web Title: Lightening of caste verification office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.