घोडबंदर भागात विजेचा खेळखंडोबा
By admin | Published: June 25, 2015 12:41 AM2015-06-25T00:41:43+5:302015-06-25T00:41:43+5:30
घोडबंदर पट्ट्यात समाधानकारक वीजपुरवठा होत असल्याचा महावितरणचा दावा गेल्या काही दिवसांत अक्षरश: फोल ठरला आहे
ठाणे : घोडबंदर पट्ट्यात समाधानकारक वीजपुरवठा होत असल्याचा महावितरणचा दावा गेल्या काही दिवसांत अक्षरश: फोल ठरला आहे. गेले दोन दिवस या पट्ट्यात विजेचा लपंडाव सुरूच असून रविवारी तब्बल १२ तास अंधारात घालविल्यानंतर मंगळवारीदेखील विजेचा लपंडाव सुरूच होता. बुधवारीसुद्धा काही भागांत ६ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज नसल्याने पाण्याचे पंपदेखील सुरू न झाल्याने या भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
रविवारी घोडबंदरचा काही भाग तब्बल १२ तास अंधारात बुडाला होता. रविवारी मध्यरात्री खंडित झालेला वीजपुरवठा सोमवारी दुपारी दीडच्या दरम्यान सुरळीत झाला. तो कशामुळे खंडित झाला, याचे नेमके कारण महावितरण कर्मचाऱ्यांना समजले नाही. झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना वाढल्याने वीज वारंवार खंडित होण्याचे प्रकार वाढल्याचे महावितरण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.