नवी मुंबई : ग्रीन बिल्डिंग म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयामध्ये विजेची उधळपट्टी होत आहे. वातानुकूलित कार्यालयाच्या हट्टाचा तिजोरीवर भार वाढत आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला एक महिन्याचे बिल ३४ लाख रुपये आले असून उन्हाळ्यात बिलाचा आकडा ४० लाखांवर जाऊ लागला आहे. वर्षभरात तब्बल ४ कोटीपेक्षा जास्त खर्च वीजबिलांवर खर्च होऊ लागला आहे.
सरकारी कार्यालयांची उभारणी करताना जास्तीत जास्त सूर्यप्रकाश इमारतीमध्ये येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कमीत कमी जागेचा जास्तीत जास्त वापर करणेही अभिप्रेत असते. परंतु नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाची रचना करताना अनेक त्रुटी राहिल्या आहेत. येथे जास्तीत जास्त जागेचा कमीत कमी वापर केला जात आहे. मुख्यालयात सूर्यप्रकाश पुरेशा प्रमाणात येत नाही. परिणामी पूर्णपणे विजेवर अवलंबून राहावे लागत आहे. संपूर्ण इमारतीमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामुळे वीजबिलामध्ये प्रचंड वाढ होत आहे. मुख्यालयाची उभारणी केली तेव्हा महिन्याला १२ ते १५ लाख रुपये वीजबिल येत होते. आता हा आकडा ३० ते ४० लाखावर पोहोचला आहे.
यावर्षी मे महिन्यात ४० लाख ६२ हजार व जून महिन्यात ४२ लाख २६ हजार रुपये बिल आहे. हिवाळा सुरू झाल्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या महिन्यात नोव्हेंबरचे बिल महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे. तब्बल ३४ लाख रुपये बिल आले आहे. याचाच अर्थ प्रत्येक दिवशी १ लाख रुपयांची वीज वापरली जात आहे. गत एक वर्षामध्ये वीजबिलावर ४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. जनतेच्या पैशाची वातानुकूलित यंत्रणेवर उधळपट्टी होत आहे. महानगरपालिका मुख्यालयात सूर्यप्रकाश येण्यासाठी जागा नाही. खिडक्या उघड्या ठेवण्याची नैसर्गिक हवा आतमध्ये येण्याचीही काहीच सोय नाही. यामुळे नाइलाजाने वातानुकूलित यंत्रणेवर अवलंबून राहावे लागत आहे. महानगरपालिका प्रशासनाने विजेचा हा भार कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
स्थापनेपासूनचे वीजबिल कितीमहानगरपालिका मुख्यालयाचे उद्घाटन होऊन जवळपास १० वर्ष झाली आहेत. या दहा वर्षामध्ये वीजबिलावर नक्की किती खर्च झाला याविषयी सामाजिक कार्यकर्त्यांनी तपशील मागविण्यास सुरुवात केली आहे. माहिती अधिकाराचा वापर करूनही माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असून अद्याप पूर्ण माहिती दिली जात नाही.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या वीजबिलावर प्रतिदिन१ लाख रुपये खर्च होत आहेत. वर्षाला ४ कोटी रूपये बील भरावे लागत असून हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. वीजबचतीसाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. -समीर बागवान, उपशहर प्रमुख शिवसेना
महिनानिहाय वीजबिलाचा तपशीलमहिना - वीजबिलनोव्हेंबर २२ - २७८२५९४डिसेंबर २२ - २८८५२०५जानेवारी २३ - २६७२५२४फेब्रवारी - २७८८००२मार्च - ३३१०९४९एप्रिल ३५६८८२७मे - ४०६२३४४जून - ४२२६१८२जुलै ३५५९४३७ऑगस्ट ३६२९९२७सप्टेंबर ३६३३६२५ऑक्टोबर ३८७११०१नोव्हेंबर - ३४२९५४०