विजेचा लपंडाव चोरट्यांच्या पथ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 03:14 AM2018-06-02T03:14:40+5:302018-06-02T03:14:40+5:30
शहरात विजेचा लपंडाव सुरू असतानाच चोरट्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाच झटका दिल्याचा प्रकार वाशीत घडला आहे.
नवी मुंबई : शहरात विजेचा लपंडाव सुरू असतानाच चोरट्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाच झटका दिल्याचा प्रकार वाशीत घडला आहे. सेक्टर १५ मधील महावितरण कर्मचाºयांच्या वसाहतीमधील सहा घरांचे कुलूप तोडून घरफोडी झाली आहे.
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कळवा येथील महावितरणच्या सबस्टेशनला आग लागल्याने शहरातल्या अनेक विभागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याशिवाय मागील काही दिवसांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरूच आहे. त्यामुळे ऐन गरमीच्या दिवसात वीज गुल होत असल्याच्या त्रासामुळे रहिवाशांमध्ये महावितरणच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. अशातच शहरात सुरू असलेला विजेचा लपंडाव चोरट्यांच्या पथ्यावर पडू लागल्याचा प्रकार वाशीत घडला आहे.
सेक्टर १५ येथील महावितरणच्या कर्मचाºयांच्या सोसायटीमधील सहा घरे एकाच रात्रीत फोडण्यात आली आहेत. संबंधित घरातील व्यक्ती सुट्टीनिमित्ताने गावी गेल्याने घरे बंद असताना त्याठिकाणी घरफोडी झाली आहे. शुक्रवारी सकाळी सदर घरांचे टाळे तुटलेले असल्याचे शेजारच्यांच्या निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मध्यरात्रीच्या सुमारास विजेचा लपंडाव सुरू असताना या घरफोड्या झाल्या असाव्यात असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
सदर सोसायटीला सुरक्षारक्षक असताना देखील हा प्रकार घडला आहे. घटना उघडकीस आल्यानंतर वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.