शारीरिक आजाराप्रमाणे मानसिक आजार कोणालाही होऊ शकतो - हमीद दाभोलकर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 10:00 AM2024-01-20T10:00:02+5:302024-01-20T10:00:16+5:30
शुक्रवारी सीबीडीतील वारकरी भवन येथे अन्नपूर्णा परिवाराचा ३१वा वर्धापन दिन उत्साहात पार पडला
नवी मुंबई : शारीरिक आजार ज्याप्रमाणे कोणालाही होऊ शकतात, त्याप्रमाणे मानसिक आजारदेखील कोणालाही होऊ शकतात. डिप्रेशन आणि चिंतेचे प्रमाण वाढल्यावर एकटेपणा येतो आणि त्यातून काही वेळा आत्महत्येसारख्या घटना समोर येतात. त्यामुळे वेळीच मनाचे आजार ओळखणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉ. हमीद दाभोलकर यांनी दिला.
शुक्रवारी सीबीडीतील वारकरी भवन येथे अन्नपूर्णा परिवाराचा ३१वा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. त्यावेळी डॉ. दाभोलकर यांनी दूरदृश्य माध्यमातून संवाद साधला. मागील वर्षाच्या तुलनेत कर्जवाटप वाढल्याने यंदा नफ्यात वाढ झाली असून, यावर्षी दोन कोटी दोन लाख रुपयांचा नफा झाला असल्याचे अन्नपूर्णा परिवाराच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. मेधा पुरव-सामंत यांनी सांगितले. त्यामुळे यंदा सभासदांना १० टक्के लाभांश देण्याची घोषणा त्यांनी केली.
व्यवस्थापकीय मंडळाच्या सदस्य वृषाली मगदूम यांनी समाजात जातीधर्माच्या द्वेष पसरलेला असून, तो बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र राहण्याचा सल्ला दिला. अन्नपूर्णा परिवारामुळे एक लाख २४ हजार महिलांमध्ये बदल झाला असून, परिवर्तनाच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्यवस्थापकीय मंडळाच्या सदस्य अंजली दिवाण पाटील, रोहिणी देशपांडे तसेच शेकडो महिला उपस्थित होत्या. वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. उज्ज्वला वाघोले यांनी अहवालाचे तर आरती शिंदे यांनी ठरावांचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धी कुलकर्णी यांनी केले.