दिव-दमणहून तस्करीच्या मार्गाने बहारीनला पाठविण्यात येणारा ७६ लाखांचा मद्य साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 08:56 PM2023-09-26T20:56:58+5:302023-09-26T20:58:13+5:30
याप्रकरणी त्रिकुटाला अटक करण्यात आली आहे.
मधुकर ठाकूर
उरण : दिव-दमणहुन जेएनपीए बंदरातुन तस्करीच्या मार्गाने बहारीन येथे निर्यातीच्या तयारीत असलेल्या तीन कंटेनरमधील ७६ लाखांचे मद्य जासईतील एका गोदामातून जप्त करण्यात आले आहे.रविवारी उरण राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी त्रिकुटाला अटक करण्यात आली आहे.
जेएनपीए बंदरातुन दिव-दमण येथून आलेले मद्य तस्करीच्या मार्गाने बहारीनला पाठविण्यात येणार असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना मिळाली होती. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह उरण येथे शनिवार पासूनच विविध ठिकाणी गस्त ठेवली होती. त्यांना रविवारी रात्रीच्या सुमारास जासई-उरण येथे तीन संशयीत ट्रेलर आढळून आले. त्यांची तपासणी केली असता सिग्नेचर व्हिस्कीचे २२८० बॉक्स तर मॅकेडॉवेल्स व्हिस्कीचे ३७५ बॉक्स माल जप्त करण्यात आला.या एकूण मालाची किंमत ७६ लाख आहे.याप्रकरणी हरिश्चंद्र गायकवाड (पाटोदा- बीड), मोहम्मद वसीर (उत्तरप्रदेश), देविदास तांदळे (आष्टी- बीड) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
सहआयुक्त सुनील चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त यतीन सावंत, ठाणे विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे, रायगडचे अधिक्षक आर.आर. कोले यांच्या मार्गदर्शनाखाली उरणचे दुय्यम निरीक्षक प्रवीण माने, सुहास दळवी यांनी ही कारवाई केली आहे.याप्रकरणी अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत असल्याची माहिती उरण विभागाचे निरीक्षक प्रवीण माने यांनी दिली.