सिडकोच्या मेगा गृहप्रकल्पातील पात्र-अपात्र अर्जदारांची यादी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 02:09 AM2019-07-29T02:09:14+5:302019-07-29T02:09:44+5:30
सिडकोच्या माध्यमातून आॅगस्ट २०१८ मध्ये १४,८३८ घरांची योजना जाहीर करण्यात आली.
नवी मुंबई : सिडकोच्या मेगागृहप्रकल्पातील यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीचे काम पूर्ण केल्यानंतर आता अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे पात्र व अपात्र अर्जदारांची यादी जाहिर करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र ठरलेल्या अर्जदारांना घरांचे अॅलोटमेंट अर्थात ताबापत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तर अपात्र ठरलेल्या अर्जदारांना राहून गेलेले त्रुटी दूर करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
सिडकोच्या माध्यमातून आॅगस्ट २०१८ मध्ये १४,८३८ घरांची योजना जाहीर करण्यात आली. या योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. २ आॅक्टोबर २०१८ रोजी या योजनेची संगणकीय सोडत काढण्यात आली, यात यशस्वी ठरलेल्या अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे अॅक्सिस बँकेच्या संबंधित शाखांत जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. प्राप्त झालेल्या या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी मार्च २०१९ मध्ये निवारा हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले. अर्जदारांना कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी ई-मेल, फोन तसेच एसएमएसद्वारे वेळ देण्यात आली. या प्रणालीच्या माध्यमातून कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी अर्जदारांना ३१ मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती.
या कालावधीत यशस्वी ठरलेल्या सर्व अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर पडताळणी पूर्ण झालेल्या अर्जांची पात्र आणि अपात्र अशा दोन गटात वर्गवारी करण्यात आली आहे. सोडतीत यशस्वी ठरलेल्या ज्या अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत, त्यांना अपात्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. असे असले तरी अपात्र ठरलेल्या या अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी पंधरा दिवसाच्या आत संबधित विभागाकडे अपिल करता येणार आहे. अपिल करण्यासाठी १३ आॅगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अपिलात जाणाऱ्या अर्जदारांनी सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावरून आॅनलाईन अपॉईमेंट घेणे आवश्यक आहे. त्यानंतर दिलेल्या वेळेत आवश्यक कागदपत्रे पुर्नपडताळणीसाठी सादर करणे गरजेचे आहे. सिडकोचे व्यवस्थापक (पणन-२) अपिलावरील अंतिम निर्णय घेणार आहेत. दरम्यान, विविध तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरलेल्या अर्जदारांना आपली पात्रता सिध्द करण्यासाठी ही अखेरची संधी असल्याचे सिडकोच्या संबधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.