नवी मुंबईमधील ४६ अनधिकृत बांधकामांची यादी जाहीर; घरे खरेदी न करण्याचे आवाहन
By नामदेव मोरे | Published: October 14, 2022 11:14 AM2022-10-14T11:14:53+5:302022-10-14T11:15:37+5:30
नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : शहरातील ४६ अनधिकृत बांधकामांची यादी नवी मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केली आहे. संबंधीत बांधकाम धारकांना एमआटीपी अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे. या इमारतींमध्ये घरे, दुकाने खरेदी करू नयेत असे आवाहन केले असून नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरु केली आहे. सर्व विभागांमध्ये नियमीतपणे अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. अनधिकृत बांधकाम सुरू असल्यास संबंधीतांना नोटीस दिली जात आहे. वेळ पडल्यास गुन्हेही दाखल केले जात आहेत. यानंतरही बांधकाम सुरूच राहिल्यास त्यावर कारवाई केली जात आहे. सप्टेंबर महिन्यात शहरातील ४६ बांधकामांना नोटीस देण्यात आली आहे. विकासक व अनधिकृत बांधकाम धारकाचे नाव, अनधिकृत बांधकामाचा पत्ता, किती बांधकाम केले आहे, संबंधीतांना कधी नोटीस पाठविण्यात आली आहे याचा तपशील मनपाने प्रसिद्ध केला आहे.
नागरिकांनी अनधिकृत बांधकामांमध्ये घरे खरेदी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. खोटी प्रलोभणे दाखवून व स्वस्त दरात अनधिकृत इमारतीमधील घरे विकली जात आहेत. सर्वसामान्य नागरिक आयुष्यभराची कमाई ही घरे खरेदी करण्यासाठी खर्च करत आहेत. अनधिकृत इमारतींवर कारवाई केल्यानंतर सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत असते. यामुळे नागरिकांनी घरे खरेदी करताना योग्य शहानिशा करूनच खरेदी करावी असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
विभागनिहाय नोटीस दिलेली बांधकामे
विभाग - अतिक्रमणे
बेलापूर - ३
नेरूळ ३
वाशी १
तुर्भे ८
कोपरखैरणे १३
घणसोली १४
ऐरोली ४
तुर्भेमध्ये हॉटेलसह लॉजींग
तुर्भे सेक्टर १९ मधील भूखंड क्रमांक १५ व १६ येथै वेअर हाऊसच्या जागेवर रूम बनवून लॉजींगचा व्यवसाय सुरु आहे. सेक्टर १९ ई भूखंड क्रमांक ४७ वर हाॅटेल सुरु करण्यात आले आहे. सेक्टर १९ ए मधील भूखंड क्रमांक ४३ वरही लॉजींगचा व्यवसाय सुरु असून या बांधकामांनाही महानगरपालिकेने नोटीस दिली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"