नवी मुंबई : पनवेल महापालिका निवडणुकीसाठी २९ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे. परंतु भाजपा, शेकापसह एकाही पक्षाने अद्याप उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येणार आहेत. काही ठरावीक जणांना उमेदवारीचा ग्रीन सिग्नल देवून प्रचार सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सक्षम उमेदवार नसलेल्या पक्षांनी त्यांचे पूर्ण लक्ष बंडखोरी कोण करणार यावर केंद्रित केले आहे. महापालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांचा एक दिवसासाठी अक्षय तृतीयेचा मुहूर्त चुकला आहे. २९ एप्रिलला विनायक चतुर्थीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होत असून ६ मे एकादशीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. यामध्येच महाराष्ट्र दिनाची सुटी असल्याने अर्ज भरण्यास फक्त सात दिवसांचा कालावधी मिळणार आहे. निवडणूक घोषित झाल्यापासून प्रचाराचा धडाका लावलेल्या स्वयंघोषित उमेदवारांना अद्याप त्यांच्या पक्षाने अधिकृतपणे उमेदवारी दिलेली नाही. प्रमुख पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षामध्ये ७८ जागांसाठी तब्बल ३०० पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आहेत. प्रत्येक जागेसाठी किमान ३ ते ४ जण इच्छुक असल्याने उमेदवार निवडीची कसोटी पक्षश्रेष्ठींसमोर उभी राहिली आहे. कोणत्याही स्थितीमध्ये पालिकेची सत्ता मिळविण्यासाठी पक्षाचे नेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर परिश्रम करत असून उमेदवारी अगोदर घोषित केल्यास बंडखोरी होण्याच्या शक्यतेने अद्याप उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. शेवटच्या क्षणी उमेदवारांना ए.बी. फॉर्म देण्यात येणार आहेत. शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी व काँगे्रस आघाडीमध्येही उमेदवार निवडीवरून बंडखोरी होण्याची शक्यता आहे. यामुळे या दोन्ही प्रमुख प्रतिस्पर्धींनी हमखास निवडून येणाऱ्या व फारशी स्पर्धा नसलेल्या प्रभागांमधील कार्यकर्त्यांना कामाला लागा, तुमची उमेदवारी निश्चित असल्याचे सांगितले आहे. वादग्रस्त ठिकाणी सर्वांना विश्वासात घेवून उमेदवार निश्चितीसाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना, मनसे, प्रहार, एमआयएमसह अनेक राजकीय पक्ष निवडणुकीत ताकद आजमावणार आहेत. खासदार श्रीरंग बारणे, पक्षाचे नेते आदेश बांदेकर यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरवात केली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: महापालिका निवडणुकीवर लक्ष देत असून त्यांनीही अद्याप उमेदवार निश्चित केलेले नाहीत. अनेक छोट्या पक्षांकडे सर्व ७८ प्रभागांसाठी सक्षम उमेदवार नाहीत. या सर्वांनी भाजपा, शेकापमधून कोण बंडखोरी करणार याकडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे. २९ एप्रिलपासून अर्ज भरण्यास सुरवात होणार असली तरी बंडखोरीच्या शक्यतेने बहुतांश उमेदवार शेवटच्या दोन किंवा तीन दिवसांमध्ये अर्ज सादर करणार आहेत.
भाजपासह शेकापची यादी गुलदस्त्यात
By admin | Published: April 28, 2017 12:44 AM