शिक्षणाधिकारी, सत्ताधारी नगरसेवकात शाब्दिक वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:18 AM2019-02-10T00:18:04+5:302019-02-10T00:18:38+5:30
महापालिकेच्या सीबीएसई शाळेच्या शिक्षण प्रवेश अर्जवाटपाबाबत शिक्षणाधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप करीत, जाब विचारण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल डोळस यांना शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्यात शुक्रवारी महापालिका मुख्यालयात वादावादी झाली.
नवी मुंबई : महापालिकेच्या सीबीएसई शाळेच्या शिक्षण प्रवेश अर्जवाटपाबाबत शिक्षणाधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप करीत, जाब विचारण्यासाठी गेलेल्या राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल डोळस यांना शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यांच्यात शुक्रवारी महापालिका मुख्यालयात वादावादी झाली. नगरसेवक आणि अधिकारी यांच्यात विविध कारणांवरून यापूर्वीपासून वाद सुरू असून या प्रकारामुळे भविष्यात आणखी वाद वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महापालिकेच्या सीबीएसई शाळेत प्रवेश घेण्यासाठीची अर्ज मुदत संपल्याने मुदत वाढवून देण्याची मागणी डोळस यांनी शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांच्याकडे केली होती. त्या वेळी संगवे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दोन दिवसांत अर्ज देतो म्हणून सांगितले होते. दोन दिवसांनी डोळस पालकांसमवेत संगवे यांच्या कार्यालयात गेले, त्या वेळी संगवे यांनी सुमारे एक तास प्रतीक्षा करावयास लावून अर्ज देण्यासाठी टाळाटाळ केल्याचा आरोप डोळस यांनी केला आहे. यासंदर्भात डोळस यांनी संगवे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांच्यात वादावादी झाली. दरम्यान, या प्रकाराने संतापलेल्या डोळस यांनी संगवे यांच्या टेबलावर असलेल्या फाइल भिरकावल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, अर्जासाठी आपण ३१ जानेवारी पर्यंतची मुदत दिली होती. वृत्तपत्रात तशा अशयाची जाहिरात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली होती. विशेष म्हणजे, सदर शाळा आपण खासगी संस्थेला चालवायला दिली आहे. प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया या संस्थेमार्फतच केली जाते, असे असले तरी प्रत्येक लोकप्रतिनिधींचा सन्मान राखण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातो. त्यामुळे अर्जाची मुदत वाढविण्याचा प्रश्नच येत नाही, असे संगवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे. याआधीही महापालिका अधिकारी आणि नगरसेवक हा वाद सुरू होता, हा वाद धुमसत राहणार असल्याची चर्चा रंगली आहे. डोळस आणि संगवे यांच्यातील हा वाद प्रातिनिधिक स्वरूपाचा असला तरी येत्या काळात तो चिघळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.