डोंबिवली : शहरात होणारे ९० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साहित्यातील वेगळ्या विचारांना सामावून घेणारे, सर्वसमावेशक असेल. साहित्यातील सगळ्या प्रवाहांना स्पर्श करणारे संमेलन होईल. साहित्य संमेलन हे आधुनिक स्वरूपाचे स्मार्ट संमेलन असेल, असा दावा साहित्य संमेलनाच्या आयोजक असलेल्या ‘आगरी युथ फोरम’ने केला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या निमंत्रक संस्थेसोबत एक बैठक १९ व २० तारखेला होत आहे. त्यासंदर्भात विषयाची चर्चा करण्यासाठी संमेलनाच्या कार्यालयात गुरुवारी सायंकाळी एका बैठक झाली. या वेळी साहित्यिकांच्या सूचना व प्रस्ताव जाणून घेण्यात आले. याप्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष व फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, साहित्यिक रविप्रकाश कुलकर्णी, प्रकाश चांदे, मसापचे सुरेश देशपांडे, गणेश मंदिर संस्थानचे प्रवीण दुधे आदी उपस्थित होते. संमेलन नियोजनासाठी तयार केलेल्या डायरीचे प्रकाशन करण्यात आले. या डायरीच्या प्रती कार्यकर्त्यांना दिल्या जातील, असे वझे म्हणाले.देशपांडे यांनी सांगितले की, साहित्य संमेलनाची तारीख फेब्रुवारीच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात घेतली जाईल. विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा विचार करूनच संमेलनाची तारीख ठरेल. साहित्य संमेलनाची दिंडी गणेश मंदिर संस्थानपासून काढण्यात येईल. या सगळ्या सूचनांचा विचार करून कार्यक्रमाची आखणी केली जाईल, असे वझे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
साहित्य संमेलन सर्वसमावेशक
By admin | Published: November 18, 2016 3:10 AM